

कोल्हापूर : नशिल्या इंजेक्शनसह गांजाची तस्करी करणार्या तिघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी मुसक्या आवळल्या. सोहिल संभाजी मोहिते (24, रा. जाधव पार्क, जरगनगर, सध्या रा. कळंबा), रोहन संजय चव्हाण (33, कवडे गल्ली, कसबा बावडा) व अजय श्रीकांत डुबल (44, शिंदे मळा, खोतवाडी, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संशयितांकडून इंजेक्शनच्या 80 बॉटल्स व 1 किलो 250 ग्रॅम गांजा असा 1 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. तस्करीत आणखी काही संशयितांचा सहभाग असावा, असा संशय आहे.
वैद्यकीय अधिकार्यांच्या चिठ्ठी व सल्ल्याशिवाय बेकायदा नशिल्या इंजेक्शनच्या बॉटल्सची विक्री करणारे रॅकेट शहरासह ग्रामीण भागात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयितांच्या हालचालींवर पाळत ठेवली. कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाजवळ इंजेक्शनची विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून सोहिल मोहिते, रोहन चव्हाण यांना ताब्यात घेतले. झडतीत इंजेक्शन बॉटल्स व गांजा हस्तगत करण्यात आला.
हा साठा कुठून आणला, याची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये खोतवाडी (हातकणंगले) येथील अजय श्रीकांत डुबल याचे नाव निष्पन्न झाले. त्याला तत्काळ ताब्यात घेतले. तस्करीमध्ये आणखी काही साथीदार सक्रिय असल्याचा संशय आहे. चौकशीत नावे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.