

इचलकरंजी : पैशाची चणचण दूर करण्यासाठी घरातच 500 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा छपाई करून त्या वितरित करण्याच्या तयारीत असलेल्या इचलकरंजीतील तिघा युवकांच्या टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी अनिकेत विजय शिंदे (24, रा. पंत मंदिर समोर, मंगळवार पेठ), राज रमेश सनदी (19, रा. भुईनगर शहापूर) आणि सोएब अमजद कलावंत (19, रा. परीट गल्ली गावभाग) या तिघा संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत त्यांच्याकडून 2 लाख 24 हजाराच्या बनावट नोटा आणि 70 हजार 700 रुपयांचे इतर साहित्य असा 2 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची माहिती पो.नि. रवींद्र कळमकर यांनी दिली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिघा संशयितांना 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील नारायण चित्रमंदिर परिसरात बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवरुन पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला. पथकाने अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने घरातच बनावट नोटांची छपाई करीत असल्याचे व त्यामध्ये राज सनदी व सोएब कलावंत मदत करीत असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी शिंदे रहात असलेल्या भाड्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातील दुसर्या मजल्यावर असलेल्या खोलीत कलावंत व सनदी हे दोघे मिळून नोटांसाठी लागणारे कागद कट करीत होते. त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी घरातच बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले प्रिंटर, नोटांसाठीचा कागद, दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त केले. तसेच 500 रुपयांचा 392 आणि 100 रुपयांच्या 282 अशा 2 लाख 24 हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलिस अंमलदार संतोष बरगे, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव यांच्या पथकाने केली.