

जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा हत्ती केंद्रातील पथक नांदणी येथे आले आहे, असा समज गुरुवारी रात्री झाल्याने नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या निशिधी येथे हजारोंच्या संख्येने समाजबांधव व नागरिक दाखल झाले. यावेळी ‘आम्ही हत्तीला नेऊ देणार नाही’, अशी भावना व्यक्त करून नागरिकांनी आक्रोश व्यक्त करीत तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यामुळे नांदणी परिसरात तणावाचे वातावरण बनले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी दहा वाजता मूक मोर्चा आयोजित केला असून यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन हत्ती बचाव कृती समितीने केले आहे. गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने तणावपूर्ण वातावरण बनले होते.
1200 वर्षांची परंपरा असलेला नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी, कोल्हापूर, तेरदाळ, बेळगाव हा प्रसिद्ध आहे. या मठाकडे पूर्वार्धीकाळापासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले होते. त्यानुसार नांदणी येथील ‘महादेवी हत्तीण’ला गुजरात येथे 2 आठवड्यात पाठविण्याची परवानगी दिली आहे.
मात्र, नांदणी मठाची 1200 वर्षांची परंपरा असल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हत्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाल्याने हे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी आले, अशी चर्चा निर्माण झाल्याने नागरिक जयसिंगपूर मार्गावरील असलेल्या निशिधीत 4 ते 5 हजार नागरिक जमा झाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता गांधी चौकातून भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा निशिधीसमोर दिवसभर थांबणार आहे. याबाबत नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. असे असताना पथक आल्याचे समजल्यानंतर हजारो नागरिक जमा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हत्ती द्यायचा नाही यासाठीच मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे हत्ती बचाव कृती समिती पदाधिकार्यांनी सांगितले.
नांदणीच्या महादेवी हत्तीला गुजरात येथील हत्ती केंद्रात नेण्याचा न्यायालयाने आदेश दिल्यापासून हत्ती बचाव ही भूमिका समस्त जैन समाजाने व नागरिकांनी घेतली होती. गुरुवारी दिवसभर हत्तीला न्यायला पथक येणार आहे, अशी चर्चा होती. अशातच गुरुवारी रात्री हत्तीला न्यायला पथक आले असल्याचा समज झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासातच हजारोंच्या संख्येने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.