

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अन्यायी शैक्षणिक धोरणांविरोधात शुक्रवारी हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक रस्त्यावर उतरले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढत शासनाचा निषेध केला. 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा आदेश रद्द करा, पवित्र पोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती प्रक्रिया राबवा, जुनी पेन्शन योजना लागू करा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
शिक्षण विभागाच्या अनेक अन्यायकारक आदेशामुळे शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असून असंतोषाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. प्रलंबित प्रश्नावर शासन जाणीवपूर्वक अन्याय करत आहे. याविरोधात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा संस्था चालक संघ व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मोर्चा काढला.
वाजत-गाजत सुरुवात झाली. काहींनी ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ अशा आशय असणार्या टोप्या परिधान केल्या होत्या. विविध फलकातून मागण्यांकडे लक्ष वेधले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामोर्चाचा समारोप झाला. यावेळी आमदार जयंत आसगावकर म्हणाले, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांसह सर्व समाजातील घटकांनी जागरूक होण्याची गरज आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, शासनाच्या अन्यायपासून शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थ्यांना जागृत केले पाहिजे.
शैक्षणिक व्यासपीठचे सभाध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे राज्यातील हजारो शाळा बंद पडणार आहेत. डी. आर. माने शिक्षण संस्थेचे प्रमुख भैया ऊर्फ प्रताप माने म्हणाले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या एकजुटीने काय होते हे सरकारने पाहिले आहे. शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, पवित्र पोर्टलमधून शिक्षकेतर कर्मचारी भरती करणे चुकीचे आहे. जिल्हा मुध्याख्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, स्वामी विवेकांनद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे भाषण झाले. यावेळी माजी आ. भगवानराव साळुंखे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, व्ही. जी. पोवार, श्रीराम साळुंखे, डी. एस. घुगरे, खंडेराव जगदाळे, उदय पाटील, सुधाकर सावंत आदींसह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
शिक्षक-शिक्षकेतर भरती नाही. शाळा बंद पडत आहेत. लाडक्या बहिणीमुळे अर्थ खाते रिकामे झाले असून आता शिक्षणाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, हे दुर्दैव असल्याची टीका प्राचार्य साळुंखे यांनी केली.
जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहिल्या. यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या अघोषित सुट्टीमुळे शाळा परिसरात शुकशुकाट होता.
15 मार्च 2024 च्या संच मान्यतेचा आदेश रद्द करा
14 ऑक्टोबर 2024 च्या निर्णयानुसार शाळांना टप्पा वाढ त्वरित द्या
शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
शिक्षकेतर कर्मचार्यांना पूर्वीप्रमाणेच शासन मान्यता द्या
पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा शिक्षक भरती करा.