

कसबा बावडा : ‘जब तक सूरज-चाँद रहेगा... दादा आपका नाम रहेगा !’ अशा घोषणा देत शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अतुल्य योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना बुधवारी कसबा बावड्यात हजारो नागरिकांनी अश्रुपूर्ण निरोप दिला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिवसभर नागरिक, महिला, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. कसबा बावडा परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
येथील ‘यशवंत निवास’ या राहत्या घरी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन वाजेपर्यंत हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर कौटुंबिक, धार्मिक विधी पार पाडण्यात आल्याने काही काळ अंत्यदर्शन बंद ठेवण्यात आले. दुपारी पावणे चारच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या ॲम्ब्युलन्समधून त्यांचे पार्थिव शासकीय विश्रामगृह, लाईन बाजार मार्गे डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आले. येथेही हजारो नागरिकांनी रांगा लावून अखेरचे दर्शन घेतले. साडेचारच्या सुमारास तिरंग्यात लपेटलेले पार्थिव फुलांनी सजवलेल्या विशेष आयशर वाहनात ठेवण्यात आले आणि अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरू झालेली अंत्ययात्रा लाईन बाजार, छत्रपती शिवाजी महाराज भगवा चौक, मुख्य मार्ग, पाटील गल्ली, वैरण बाजार, भाजी मंडई, अग्निशमन दल मार्गे पॅव्हेलियन मैदानाकडे रवाना झाली. मार्गाच्या दुतर्फा हजारो नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उभे राहून अश्रुपूर्ण निरोप देत होते. अनेकांनी पुष्पवृष्टी करून आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा मानवंदनेचा निरोप दिला. छत्रपती शिवाजी महाराज भगवा चौक येथे बावडा रेस्क्यू फोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. पुढे श्रीराम संस्थेच्या वतीनेही पार्थिवावर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण मार्गावर विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
विशेष वाहनातून अंत्ययात्रा
लाईन बाजार येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून तिरंग्यात लपेटलेले पार्थिव फुलांनी सजवलेल्या विशेष आयशर वाहनात ठेवण्यात आले. वाहनावर आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत याच वाहनातून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. कसबा बावड्यात विविध संस्था, मंडळे, व्यापारी संघटनांंनी ठिकठिकाणी डिजिटल फलक उभारले. त्यांच्या कार्याचा गौरव करणारे संदेश आणि छायाचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
अंत्यसंस्कार पाहण्यासाठी ठिकठिकाणी एल. ई. डी. स्क्रीन
पावसाळा असल्याने पॅव्हेलियन मैदानावर चार वेगवेगळे डोमचे मंडप उभारण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी मैदानाच्या मध्यभागी चौथरा होता. मैदानातील उपस्थितांना अंत्यसंस्कार पाहण्यासाठी ठिकठिकाणी एल. ई. डी. स्क्रीन लावण्यात आले होते. डी. वाय. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण मैदान भरले होते. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणि मैदानाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळी मैदानाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.
आज आम्ही आमचा आधार गमावला
बुधवारी सकाळीच त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कसबा बावडा येथील निवासस्थानी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. वृद्ध, महिला, युवक, विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी अशा समाजातील प्रत्येक स्तरातील लोक आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहीजण शांतपणे हात जोडून उभे राहून आपल्या भावना व्यक्त करत होते. अनेकांच्या ओठांवर एकच वाक्य होते "आज आम्ही आमचा आधार गमावला."
अनेक जण झाले भावुक
आठवणी सांगताना लोक भावुक झाले. "दादांनी माझ्या मुलाला शिक्षणासाठी मदत केली होती", "माझ्या कुटुंबाला नोकरीची संधी दिली", "अडचणीच्या काळात आधार दिला" अशा असंख्य आठवणी नागरिकांच्या ओठांवर होत्या. त्यांच्या कार्याचा स्पर्श झालेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. कसबा बावड्यातील प्रत्येकासाठी घरातील एक ज्येष्ठ, कनवाळू पालक होते, अशी प्रतिक्रिया उपस्थितांतून व्यक्त केली जात होती.