

वाशी : के. एस. रानगे
दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होणार आहे. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेर तब्बल 68 विवाह मुहूर्त (Marriage Muhurat) आहेत.
वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत (देवउठनी) चातुर्मास पाळला जातो. यावर्षी देवउठनी 12 नोव्हेंबरला आहे. द्वादशीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे. यावर्षी एप्रिल, मे, जून महिन्यात 26 विवाह मुहूर्त आहेत; तर नोव्हेंबर ते मार्च दरम्यान गतवर्षीपेक्षा सर्वाधिक विवाह मुहूर्त आहेत.
गेल्या दोन वर्षांत लग्नसराईत कोरोना काळामुळे बाजारपेठेत मंदी होती. पण यावर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत मंदी गेल्याचे दिसले. त्यामुळे लग्नसराईत पुन्हा तेजीचे उत्तम दिवस येणार आहेत. लग्नसराईच्या सिझनमध्ये मंडप डेकोरेशन, कपडे, सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक खरेदी, मंगल कार्यालय, भांडी दुकानासह संबंधित घटकातील अनेक व्यापार्यांना दोन वर्षांच्या तुलनेपेक्षा जादा उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
विवाहाच्या तारखा
नोव्हेंबर : 7, 25, 26, 27. डिसेंबर : 3, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 2, 23, 24, 26. जानेवारी : 1, 2, 7, 12, 16, 19, 21, 22,26. फेब्रुवारी : 3, 8,7, 13, 16, 7, 21. मार्च : 1, 2, 6, 7, 12, 16, 18, 20, 25, 26. एप्रिल : 14, 18, 19, 20, 21, 22, 25, 30. मे : 1, 5, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 16, 17, 20, 23, 24. जून : 2, 4, 6, 8.
चातुर्मास समाप्ती ते चातुर्मास प्रारंभपर्यंत 17 नोव्हेंबर 2024 ते जून 2025 या काळात शास्त्रानुसार 68 विवाह मुहूर्त येत आहेत. रूढी, परंपरा व शास्त्रानुसार विवाह मुहूर्त साधून शुभकार्य पार पाडावे.
सहदेव गुरव (गुरुजी) शाहू वैदिक विद्यालय