

कोल्हापूर ः कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास होऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दुसर्या विकास आराखड्यात तब्बल 432 ठिकाणी आरक्षणे टाकण्यात आली; मात्र शासनाकडून त्यातील 86 आरक्षणे विविध कारणांनी वगळण्यात आली. प्रत्यक्षात 346 आरक्षित जागांचा विकास करायचा होता; मात्र तब्बल 25 वर्षे उलटली, तरी फक्त 97 आरक्षित जागांचाच विकास झाला आहे. तब्बल 249 आरक्षित जागा 25 वर्षे विकासाशिवाय पडून आहेत. तिसर्या विकार आराखड्यात विद्यमान जमीन वापर नकाशा झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
कोल्हापूर शहराचा दुसरा विकास आराखडा 1999 मध्ये झाला. 2000 पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्या दुसर्या विकास आराखड्यात शहराच्या विकासासाठी ठिकठिकाणी आरक्षणे टाकण्यात आली होती; मात्र महापालिका प्रशासनाने अद्याप त्याचा वापर केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त 17 टक्के जागा विकसित केल्या आहेत. महापालिकेच्या वतीने कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी कंपनीला 5 कोटी 34 लाखांचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार खासगी कंपनीकडून ड्रोनद्वारे सर्व्हे करून आराखडा तयार केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीने प्रस्तावित जमीन वापर नकाशा करण्याचे काम सुरू केले आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूर शहराचा एरिया 86 चौरस किलोमीटर आहे. 2023 पासून ड्रोनद्वारे सर्व्हे सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला आहे. महापालिकेकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. तिसर्या विकास आराखड्यांतर्गत पुढील 25 वर्षांचे शहर विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. यात सोयीसुविधांसाठी आरक्षण टाकण्यात येणार आहे. तसेच झोनिंग तयार केले जाणार आहेत.