

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सीमाभागात भरदिवसा आलिशान बंगले फोडून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या इचलकरंजी परिसरातील दोघा सराईत चोरट्यांना शहापूर पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून 54 लाख रुपये किमतीचे 43 तोळे 700 मि.लि. ग्रॅम दागिने हस्तगत करण्यात आले. प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (वय 30, रा. बिरोबा मंदिरजवळ, तारदाळ, ता. हातकणंगले), उदय श्रीकांत माने (29, बेघर वसाहत, यड्राव, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यातील दागिने विकत घेणारे काही सराफ पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत.
शहापूर परिसरातील 3, हातकणंगलेतील 3, कुरुंदवाड व सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे 8 गुन्हे उघडकीला आले आहेत. टोळीत दोघांशिवाय अन्य काहीजणांचा समावेश असावा, असा संशय व्यक्त करत संबंधितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. चोरट्यांकडून काही सराफांनी दागिने विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तारदाळ (ता. हातकणंगले) येथील हरी चोपडे (रा. ज्ञानेश्वरनगर, निमशिरगाव रोड) यांच्या घरी 1 डिसेंबरला दुपारी तीन ते सहा या काळात घरफोडी झाली. चोरट्यांनी 10 लाख 92 हजार रुपये किमतीचे 9 तोळे दागिने लंपास केले. शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरू असतानाच पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रल्हाद कवठेकर, उदय माने यांची नावे निष्पन्न झाली. दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली.
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तोंड उघडले. शहापूरसह हातकणंगले परिसरातील 6, कुरुंंदवाड व सांगली ग्रामीण येथील दोन गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून 53 लाख 74 हजार रुपय किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले. संशयित कवठेकर, माने यांना 2018 व 2022 मध्ये चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. यापूर्वी त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे 6 गुन्हे उघडकीला आले होते.
सराईत टोळीचा छडा लावणारे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार यांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते रोख बक्षीस, प्रमाणपत्र देण्यात आले.