

कोडोली : पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे घरातून 14 लाख रुपये किमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिने चोरणार्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सहा दिवसांत बेड्या ठोकल्या. अक्षय शंकर पवार (मूळ रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, सध्या रा. सह्याद्री कॉलनी, अमृतनगर, पारगाव) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
सचिन प्रकाश हुजरे यांच्या राहत्या घराच्या हॉलमध्ये ठेवलेला सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स 4 जुलैला सायंकाळी लंपास केला होता. या बॉक्समध्ये 14 तोळे दागिने होते. याप्रकरणी हुजरे यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी हुजरे यांच्या घरी व त्यांच्या शेजारी नेहमी येणारा-जाणारा अक्षय यानेच ही चोरी केल्याची खबर मिळाली. या आधारे सापळा रचून 9 जुलै रोजी अमृतनगर फाटा परिसरातून त्याला ताब्यात घेतले व सर्व मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी त्याला कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.