कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाईपलाईनची पाहणी करताना मोघर्डे या ठिकाणी एअर व्हॉल्व्ह चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. मल्लेवाडी आणि म्हाळुंगे या ठिकाणी एअर व्हॉल्व्हचे नट बोल्ट अज्ञात व्यक्तींकडून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. महापालिका व संबंधित ठेकेदाराने मोघर्डे व मल्लेवाडी या हद्दीतील घटनेसंबंधाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू आहे. तसेच म्हाळुंगे येथील घटनेबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यात येतो. वर्षभरापासून हा पाणीपुरवठा सुरू आहे. 1100 मि.मीटर व्यासाच्या पाईपवर ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहे. मोघर्डे येथे नटबोल्ड काढून अज्ञात चोरट्याने हा व्हॉल्व्हच गायब केला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. या व्हॉल्व्हची चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली होती. पाहणीदरम्यान हा प्रकार लक्षात येताच तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पाईपलाईनमधून अतिशय उच्च दाबाने पाणीपुरवठा सुरू असतो. अशा काळात एअर व्हॉल्व्ह काढणे हे धोकादायक आहेच. पाईपलाईन उडाली तर जीवितहानी होऊ शकते. पाण्याची पाईपलाईन ही सरकारी मालमत्ता असलेले पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद होईल किंवा पाईपलाईनचे नुकसान होईल, अशा प्रकारचे वर्तन करणे हे गुन्हा असल्याने असे कृत्य करताना कोणी आढळल्यास अशा व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच असे कृत्य करताना कोणी आढळल्यास नागरिकांनी महापालिकेला त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी केले आहे.