लालपरीचे स्‍टेअरिंग आता 'ती'च्या हाती! सरोज हांडे ठरल्‍या कोल्‍हापुरातील पहिल्‍या महिला चालक

मलकापूर आगारात एसटी बस चालक म्‍हणून कामावर रूजू
The steering wheel of Lalpari is now in the hands of a woman! ‘Saroj Hande’ becomes the first woman driver in Kolhapur
लालपरीचे स्‍टेअरिंग आता 'ती'च्या हाती! सरोज हांडे ठरल्‍या कोल्‍हापुरातील पहिल्‍या महिला चालकFile Photo
Published on
Updated on

विशाळगड : सुभाष पाटील

आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेतली. आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतात. आज महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत, याच उदाहरण नुकतच कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलं आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आगारात एसटी बसच्या चालक म्हणून सौ सरोज महिपती हांडे या महिला आज (रविवार) (दि.१९) रोजी कामावर रुजू झाल्या. आता मलकापूर-कोल्हापूर मार्गावर महिलेच्या हाती एसटी बसचे 'स्टेअरिंग' दिसणार आहे. त्या शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे गावच्या सुकन्या आहेत.

सगळ्यांनी कधी ना कधी एसटीने प्रवास केला असेल. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, असं आजही एसटीवर लिहिलेलं असतं. त्यामुळेच आजही अनेकजन लालपरीनेच प्रवास करणं पसंत करतात. राज्यातील पहिली एसटी महामंडळाची बस १ जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे दरम्यान धावली. या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. राज्य परिवहन सेवेची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर नियमित कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली. महिला कर्मचाऱ्यांची वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र महिला कर्मचाऱ्यांना तब्बल ७७ वर्षांनंतर चालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मलकापूर आगारात प्रथमच एका महिला कर्मचाऱ्याची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरोज महिपती हांडे असे या महिला बसचालक कर्मचाऱ्याचे नाव आहे. महिलांना बसचालक म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ कोल्हापूर विभागात असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

चालक सौ हांडे यांचे प्राथमिक, माध्यमिक व पदवी शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले आहे. त्यांना ड्राईव्हिंग करण्याची आवड लहानपणापासून आहे. त्यांनी चालक भरती परीक्षेत अनेक वेळा प्रयत्न केले त्यात त्या असफल ठरल्या होत्या. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी प्रयत्न केला असता त्यांना यश मिळाल्याचे सरोज हांडे सांगतात. आई-वडिलांची प्रेरणा हे यशाचे गमक असल्याचेही त्या सांगतात.

सांगली डिव्हिजनमध्ये ५० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच तालुक्यात मलकापूर आगारात बसचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या कोल्हापूर विभागात पहिल्या महिला बसचालक ठरल्या आहेत. रविवारी (दि.१९) सकाळी त्यांचे मलकापूर आगारात स्वागत करण्यात आले. यावेळी वाहतूक निरीक्षक संतोष गणेशाचार्य, प्रशांत लकेश्री, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुप्रिया जाधव, आदिती बेर्डे, सहायक वाहतूक निरीक्षक पी जी पाटील, हेड मेकॅनिकल जयवंत जगताप, सुनील मोहिते, कामगार प्रतिनिधी हेमचंद्र जंगम आदीसह आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर विभागात पहिल्या महिला चालक म्हणून सन्मान मिळाल्याचा अभिमान आहे. आवड असल्याने या क्षेत्राकडे वळले. महिलांनी स्वत:ला कमी समजू नये. काम, नोकरी कोणतीही असो, महिला करू शकतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासोबत महिला प्रवाशींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार आहे.

सरोज हांडे, बस चालक

‘अवघ्या जगाचे सारथ्य सहजतेने करणाऱ्या ‘स्त्री शक्ती’ला आपल्या ‘लाल परी’चे वावडे का असेल? सरोजताई हांडे यांनी मलकापूर ते कोल्हापूर या मार्गावरील ‘एसटी’ नुकतीच चालवली. कोल्हापूर विभागातील पहिल्या महिला चालक होण्याचा मान हांडे यांना मिळाला, याचे आम्हा सर्वांना कौतुक आणि अभिमान आहे. सरोजताई यांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !.

          संतोष गणेशाचार्य, वाहतूक नियंत्रक, मलकापूर आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news