पाऊस थांबेना... कापणी पूर्ण होईना !

यंदा खरिपाचा हंगाम पंधरा दिवस वाढला
Harvesting of rice, groundnuts and soybeans has stopped due to the return of rain
पाऊस थांबेना... कापणी पूर्ण होईना !File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण

जिल्हा आणि परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस उसंत घेईना, थांबलेली शेतीचे काम पुढे जाईनात, अशी परिस्थिती झाली आहे.

जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी भात पिके आडवी होऊन ती पाण्याखाली येत आहेत. त्यामुळे काढणीला आलेले भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांना मोड येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील पिकांची ही परिस्थिती आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पिकांना मोड येण्यास सुरुवात झाली आहे.

दररोज दुपारपर्यंत ऊन, दुपारी तीन नंतर विजेच्या कडकडाटसह परतीचा पाऊस अशी जिल्ह्यातील परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सप्टेंबर महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील भात पिके संकटात आली होती; मात्र त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात शेतीत पाणी वाढल्याने भात पिकांना संजीवनी मिळाली होती.आता हे भात कापणीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर सोयाबीन, भुईमूगकाढणीच्या कामाला वेग आला आहे, पण दररोज सायंकाळी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भात पीके आडवी पडून पाण्याखाली येऊ लागली आहेत. परिणामी ती कुजून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ४० टक्के नुकसान झाले असून यात भर पडण्याची शक्यता आहे. या नुकसानीचे कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे सुरू करण्याची मागणी होत आहे. वरुणराजा... थोडी उसंत घे!

जिल्ह्यात सुमारे ९५ हजार हेक्टवर भात, ४६ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि २० ते २२ हजार हेक्टरवर भुईमूग ही पिके आहेत. जून महिन्यात पाऊस वेळेत न झाल्याने यावर्षी खरिपाचा हंगाम पंधरा दिवस वाढला आहे, त्यातच आता परतीच्या पावसाने भात कापणी, मळणीच्या कामात व्यत्यय आणला जात आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून वरुणराजा शेतकऱ्यांसाठी थोडी उसंत घे, अशी प्रार्थना शेतकरी करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news