

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्ट्रक्चर ऑडिटच्या कामाला सोमवारी एक आठवडा पूर्ण झाला. या कालावधीत मुंबईच्या कंपनीने नाट्यगृहातील अनेक ठिकाणचे नमुने मशिनद्वारे घेतले आहेत. या नमुन्यांची लॅबोटरीजमध्ये तपासणी होणार आहे.
त्याचा अहवाल प्राप्त होताच, पहिल्या टप्प्यातील अहवाल म्हणून संबंधित कंपनीकडून महापालिकेला एक अहवाल दिला जाणार आहे. हा अहवाल देण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्टला आग लागली. या आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले. या घटनेला आता पंधरा दिवस होऊन गेले आहेत.
नाट्यगृह जसेच्या तसे बांधण्याचा संकल्प महापालिकेने केला असून, त्यासाठी राज्यशासन २० कोटींचा निधी देणार आहे. विम्याचे काही पैसेही नुकसानभरपाई म्हणून मिळणार आहेत. सध्याचे नाट्यगृहाचे स्ट्रक्चर किती उपयुक्त आहे.
हे पाहण्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट केले जात आहे. गेल्याच सोमवारी (दि.१९) या कामाला सुरुवात झाली. आठवडाभरात नाट्यगृहातील विविध ठिकाणचे नमुणे घेऊन ते तपासणीसाठी दिले आहेत. आता पहिल्या टप्प्यातील अहवाल संबंधित कंपनीकडून दिला जाणार आहे.