विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी आपल्या पक्षाची पर्वा न करता बंडखोरीचे दंड थोपटत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत. काहींनी तर त्याही पुढे जात पक्षाचा एबी फॉर्म मिळवून बंडखोरी केली आहे. (Maharashtra Assembly Polls)
त्याला आता त्या-त्या पक्षांचे श्रेष्ठी मैत्रीपूर्ण लढतीचा मुलामा चढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून, काम करूनही अन्याय केल्याची या बंडखोरांची भावना आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून, ही बंडखोरी थोपविण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
आझमींसमोर मैत्रीपूर्ण लढतीचे आव्हान
मानखुर्द शिवाजीनगरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तसेच याच मतदारसंघात महायुतीमधील शिंदे गटाने सुरेश ऊर्फ बुलेट पाटील यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून त्यांनी 2009 मध्ये आझमी यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 9 हजार 436 मते मिळाली होती.
2014 मध्ये पाटील हे तत्कालीन शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी आझमी यांच्याविरोधात 9 हजार 937 मते मिळाली होती. एकंदरीत आझमी यांच्याव्यतिरिक्त मतदारसंघातील माहिती असलेले ते एकमेव उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत आझमी हे एकमेव उमेदवार आहेत. त्याउलट महायुतीत दोन अधिकृत उमेदवार असल्याने मतांचे विभाजन होणार आहे.
अशातच भाजपने नवाब मलिक यांना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेला मुस्लिम मतदार एकीकडे भाजपसोबतच्या महायुतीचे उमेदवार नवाब मलिक यांना मतदान करतील की लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करून आता भाजपविरोधातील महाविकास आघाडीसोबत असलेल्या आझमी यांना मतदान करतील, हा पेचप्रसंग या मतदारसंघात उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला आमदार अबू आझमी यांनी अप्रत्यक्ष मदत केली असल्याची चर्चा मानखुर्द विधानसभा मतदारसंघात अद्यापही सुरू आहे.