सैनिक टाकळी : संजीव गायकवाड
महापुराने ग्रासलेल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट, बस्तवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी या गावातील स्थलांतरित पशुपालक अद्याप अधांतरीच आहेत. गेल्या चार दिवसांपासून आपले पाळीव प्राणी घेऊन शेतकरी मिळेल त्या सोयीच्या ठिकाणी आपल्या जनावरांची आणि कुटुंबांची सोय करीत आहेत. प्रत्येक महापुरावेळी टाकळीवाडी येथे होणारी जनावरांची सोय यावर्षी प्रशासनाकडून अद्याप करण्यात आली नसल्याने अनेक पशुपालक आपली जनावरे उघड्यावर बांधून आहेत.
पै पाहुण्यांनी ज्या पूरग्रस्त कुटुंबांना आधार दिला नाही. तेही निराधार होऊन आधाराची वाट पाहत गायरान जमिनीवरील पत्र्याच्या शेडचा आसरा घेत आहेत. प्रशासनाकडून भागातील शिरोळ, कुरुंदवाड येथील छावण्याही अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत लोकप्रतिनिधी ही गप्प आहेत. आपत्ती व्यवस्थापनाकडून आपत्तीवेळी प्रशासनाकडून आपत्तीग्रस्तांवर प्रशासनाकडून खर्च करण्याचा असतो. तसा कायदा असूनही अनेक पशुपालक स्थलांतरित नागरिक स्वखर्चावरच आपापली कुटुंबे जनावरे सुरक्षित स्थळी नेत आहेत. प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे की सरकारचे पैसे बचत करण्याचा इरादा आहे. असा सवाल या निमित्ताने पशुपालकांतून व्यक्त होत आहे. जनावरे स्थलांतरित करीत असताना बरोबर आणलेला तुटपुंजा चाराही संपल्याने आता जनावरांना जगवायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासाठी अनुत्तरीतच आहे.