शिवसेनेत पेटली कलहाची ‘मशाल’

निवडीनंतर निष्ठावंतांचे ‘राजीनामास्त्र’; अनेकजण करणार ‘जय महाराष्ट्र’
The ‘flame’ of conflict ignites within Shiv Sena
शिवसेनेत पेटली कलहाची ‘मशाल’Pudhari File Photo
Published on
Updated on
सतीश सरीकर

कोल्हापूर : आधीच शिवसेना पदाधिकार्‍यांची तोंडे चार दिशेला असतात. त्यात आता जिल्हाप्रमुखांच्या निवडीने प्रचंड धुसफुस सुरू झाली आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनी ‘राजीनामास्त्र’ काढले आहे. अनेकजण ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, शिवसेनेत अंतर्गत कलहाची मशाल पेटली आहे. जिल्ह्यात पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे दोन पदे होती. त्यामुळे नव्या जिल्हाप्रमुखांची निवड होणार, हे स्पष्ट होते. माजी आ. सुरेश साळोखे यांचा मुलगा अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे आणि रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुखपदाची मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी इंगवले यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ घातली; तर सुर्वे यांना कोल्हापूर दक्षिणचे शहरप्रमुख करून त्यांची बोळवण केली. विशाल देवकुळे यांना कोल्हापूर उत्तरचे प्रमुख केले आहे. साळोखे यांना मात्र पक्षाने कात्रजचा घाट दाखवला. या निवडीमुळे शुक्रवार सकाळपासूनच शिवसेनेत चर्चेला उधाण आले. दरम्यान, जिल्ह्यात आता शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असणार आहेत. यात इंगवले यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघ, सुनील शिंत्रे हे कागल, चंदगड, राधानगरीचे जिल्हाप्रमुख, तर संजय चौगुले शाहूवाडी, हातकणंगले आणि वैभव उगळे हे शिरोळ, इचलकरंजीचे जिल्हाप्रमुख आहेत.

पक्षश्रेष्ठींनी वादाचे गांभीर्य घेण्याची गरज

एका वरिष्ठ माजी पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, निष्ठावंत शिवसैनिकांत नाराजीची लाट उसळली आहे. ज्यांनी उघडपणे शिवसेनेच्या झेंड्याखाली जीवाची पर्वा न करता आंदोलने केली. पक्षाचा प्रचार-प्रसार केला, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बळावली आहे. ‘पक्षश्रेष्ठींकडून ही लादलेली निवड,’ अशी उघड भूमिका अनेकांनी घेतली आहे. निष्ठावंतांची दखल न घेता थेट मुंबईतून ‘सेटिंग’नुसार निर्णय होत असतील, तर पक्षात राहून आम्ही काय करणार? शिवसेनेचे उरलेसुरले अस्तित्वही आणखी कमी होऊन पक्षाची अवस्था वाईट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वरवर बळकट वाटत असली, तरी शिवसेना आतून पोखरल जात आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनी मनोबल गमावल्यास शिवसेना जिल्ह्यातील राजकारणातून हळूहळू अद़ृश्य होईल. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जिल्हा शिवसेनेतील वादाकडे गांभीर्याने पाहून तातडीने संवाद साधत मार्ग काढण्याची गरज आहे; अन्यथा कोल्हापुरात शिवसेनेचे उरलेसुरले अस्तित्वही भविष्यात संकटकाळात सापडू शकते.

सुवर्णक्षण राखता आले नाहीत

कोल्हापूरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. कोणत्याही निवडणुकीची सुरुवात किंवा कुठल्याही राजकीय कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरातून रणशिंग फुंकून करत असत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तीच परंपरा पुढे सुरू ठेवली. कालांतराने कोल्हापूरकरांनी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न सत्यात उतरवले. जिल्ह्यातील दोन्ही खासदार, 6 आमदार निवडून दिल्याने शिवसेनेने सुवर्णक्षण अनुभवले. परंतु, पक्षश्रेष्ठींना ही सत्ता राखता आली नाही. राजकीय समीकरणे बदलली अन् पक्षाची अवस्था वाईट झाली. जिल्ह्यातील आमदार, खासदार सोडाच; साधा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेत पदाधिकारीही शिवसेनेचा नाही.

वादाचा फटका पक्षवाढीला

शिवसेनेला अंतर्गत कलहाचे ग्रहण सुरुवातीपासूनच आहे. तत्कालीन आ. सुरेश साळोखे व तत्कालीन जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचे जुळत नव्हते. त्यानंतर आ. राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे पटले नाही. त्यामुळे पदाधिकारी-लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाचा फटका पक्षवाढीला बसला आहे. जून 2022 मध्ये उभी फूट पडल्याने तर जिल्ह्यात पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे.

पक्ष उभारणीचे नेत्यांसमोर आव्हान

आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत वाद पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. या गोंधळाचा परिणाम निवडणुकांवर होणार आहे. कार्यकर्त्यांमधील मतभेद मिटले नाहीत, तर पक्षाचे मतपेढीचे समीकरणच कोलमडू शकते. आधीच शिंदे व ठाकरे गटात विभागलेली शिवसेना जिल्ह्यात फारशी सशक्त नसतानाच, आता पुन्हा फूट पडल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसमोर पक्ष उभारणीचे आव्हान आहे.

दोन्ही शहरप्रमुख पवार गटाचे

शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि इंगवले यांच्यात सख्य नाही. ते एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. जिल्ह्यातील शिवसेनेवर पवार यांची पकड आहे. पवार, देवणे हे विविध विषयांवर आंदोलने करत असतात. त्या आंदोलनांत सर्वच पदाधिकारी असतात; मात्र इंगवले नसतात. त्यांची भूमिका ‘एकला चलो,’ अशी असते. आता तर कोल्हापूर उत्तरचे शहरप्रमुख विशाल देवकुळे आणि कोल्हापूर दक्षिणचे शहरप्रमुख हर्षल सुर्वे हे दोघेही पवार यांना मानणारे आहेत. त्यामुळे इंगवले, देवकुळे, सुर्वे यांच्यात मनोमिलन होणार का? असा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news