हरोलीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान, दिवसाला ३ मेगावॅट विजेची निर्मिती
The first solar power project in western Maharashtra is operational in Haroli
हरोलीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठाFile Photo
Published on
Updated on

शिरढोण : बिरु व्हसपटे

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालेला पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली (ता.शिरोळ) (जि.कोल्हापूर) येथे अवघ्या सहा महिन्यात १५ एकर जागेत कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे हरोली, जांभळी, कोंडीग्रे तसेच चिपरी गावांतील एकूण ११४० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतीला दिवसा वीज मिळणेबाबत शेतकऱ्यांची रस्त्यावरची लढाई सुरू आहे. मात्र चार गावातील ११४० शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज पुरवठा करण्यात येत असून हा सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे.

कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि.०५) रोजी वाशिम जिल्ह्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यामध्ये हरोली (जि. कोल्हापूर) येथील प्रकल्पाचाही समावेश आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ८८ प्रकल्प प्रस्तावित

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट) सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.

ग्रामपंचायतीला वार्षिक ५ लाखाचे अनुदान

सुरुवातीला ४ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर ३ मेगावॅट जागेसाठी १५ एकर जागेची पूर्तता झाली. सध्या जागेसाठी तीन वर्षासाठी प्रत्येक वर्षी ५ लाख रुपये मिळत आहेत. त्यामुळे गावाच्या हितासाठी ही बाब चांगली असून शेतकऱ्यांना दिवसा शेतीला वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
तानाजी यशवंत माने, सरपंच, हरोली
आमच्या गावच्या जमिनीवर उभारलेल्या तीन मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पामुळे भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. रात्री शेतीला पाणी देण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या, आता अशा अडचणीपासून शेतकऱ्यांची मुक्तता झालेली आहे. शेतकरी दिवसभर शेतीत काबाडकष्ट करून संध्याकाळचा वेळ आपल्या कुटुंबाबरोबर निवांतपणे घालवू शकतो. या प्रकल्पाकरता मी संपूर्ण गावाच्या वतीने शासनाचे आभार मानत आहे.
शेतकरी कुबेर पाटील, हरोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news