

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून तिसर्या व चौथ्या टप्प्यातील कामे सध्या गतीने सुरू आहेत. सोमवारी महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. यावेळी नाट्यगृहाच्या चारही टप्प्यांतील कामांचा संबंधित ठेकेदारांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला.
दुसर्या टप्प्यातील ठेकेदार व्ही. के. पाटील यांच्यामार्फत नाट्यगृहाशी संबंधित ग्रीन रूमचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कलादालन व बाल्कनीच्या जिन्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच खासबाग स्टेज व तटबंदीचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तिसर्या व चौथ्या टप्प्यातील ठेकेदार गोदरेज कंपनी यांना एकॉस्टीक पॅनेल, कारपेट व बैठक व्यवस्थेच्या नमुन्यांची तपासणी करून प्रकल्पाचे उर्वरित काम दि. 25 मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सध्या टप्पा तीन व चारअंतर्गत बाल्कनी, स्टेज, विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था, ग्रीन रूम व प्रसाधनगृहांचे काम एकाच वेळी गतीने सुरू असून या कामकाजाबाबत प्रशासकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, व्यवस्थापक समीर महाब—ी, स्ट्रक्टवेल कंपनीचे राजेश यादव, सुनील पोवार, श्रीनिवास सुलगे, अभियंता व्ही. के. पाटील तसेच गोदरेज कंपनीचे अभियंता महेश पांचाळ उपस्थित होते.