कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शियेतील परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर दोघाही नराधमांकडून लैंगिक अत्याचार झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबकडून अहवाल मिळाल्यावर दोघांवरही दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
राहुल कुमार (वय १९) व दिनेशकुमार केशनाथ साह (२५, दोघेही मूळ रा. बिहार) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, संबंधित मुलीचे आधार कार्ड किंवा वयाचा कोणताच पुरावा नाही. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे एक पथक लवकरच बिहारला जाणार आहे,
अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. बिहारमधील कुटुंबे मोलमजुरीसाठी शिये येथे राहतात. एका कुटुंबातील १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला.
याप्रकरणी मुलीचा मामा दिनेशकुमार याला पोलिसांनी अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता, सीसीटीव्ही फुटेजमधून त्या ठिकाणी आणखी एक आरोपी आढळला आहे. त्यानुसार राहुल कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
दोघांनीही पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर लैंगिक अत्याचाराची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल लवकर देण्याची विनंती केल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.