

प्रवीण मस्के
कोल्हापूर : राज्यभर एकाचवेळी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडणारी टोळी आता जेरबंद झाली आहे. ‘टीईटी’ पेपरफोडीची रविवारची रात्र काळी होती, मात्र कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई करीत संपूर्ण टोळी पकडून रॅकेटचा पर्दाफाश केला. टोळीने करवीर, कागल व राधानगरी तालुक्यांतील सुमारे 50 परीक्षार्थींकडून तीन लाखांचे धनादेश घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘टीईटी’ परीक्षा घेण्यात आली. तत्पूर्वी रविवारी पहाटे पोलिसांनी मुरगूडजवळील सोनगे येथे पेपरफोडी रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, सोळांकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य गुरुनाथ चौगले यासह 18 जणांना अटक करण्यात आली. प्राचार्य चौगले हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी पेपर फोडणारा म्होरक्या होता. चौगले गेल्या आठवडाभरापासून चारचाकी वाहनातून साथीदारांसह विविध तालुक्यांत फिरत परीक्षार्थी ‘गिर्हाईक’ शोधत होता. ‘ओळखीचा उमेदवार असेल तर नंबर द्या’ असे सांगत तो नेटवर्क वाढवत असल्याची माहिती पुढे आली आहे.
उमेदवार मिळाल्यावर त्यांची शैक्षणिक मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली जात. परीक्षेत पास करण्याचे आश्वासन देत 3 ते 4 लाखांची बोली लावून अॅडव्हान्स म्हणून कोरे धनादेश घेण्यात आले. फोन टॅपिंगदरम्यान चौगले मुदाळतिट्ट्याहून काही मिनिटांत सोनगे येथे पोहोचल्याची चर्चा आहे. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून टोळीतील सर्वांना जेरबंद केले. मोहीम फत्ते झाल्यानंतर त्या रात्री गोव्याला जाऊन सेलिब—ेशन करण्याचा टोळीचा प्लॅन होता. यातील काही आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा असून मुरगूड पोलिस ठाण्यासमोर दिवसभर चारचाकी वाहनांची मोठी लगबग दिसून आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेत राज्यभर दबदबा आहे. राधानगरी व कागल येथील अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यासाठी काही शिक्षक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत; परंतु याच तालुक्यातील काही शिक्षकांनी ‘टीईटी’ पेपर फोडण्याचा प्रयत्न करीत नावलौकिकास काळिमा फासला आहे.
शिक्षक पात्रता चाचणी (महा-टीईटी) परीक्षेआधीच टीईटीचा पेपर फोडणार्या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी राज्य परीक्षा परिषदेच्या यंत्रणेतील कुणीतरी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. परीक्षा बंधनकारक केल्यानेच नोकरीतून बाहेर पडण्याच्या भीतीने या शिक्षकांनी पेपर फोडणार्या टोळीचा आधार घेतल्याची चर्चा शिक्षणक्षेत्रात सुरू झाली आहे.
‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फोडणार्या टोळीने 50 उमेदवारांकडून लाखो रुपयांचे धनादेश व कागदपत्रे घेतली आहेत. त्यामधील बहुतांश जणांनी रविवारी झालेली ‘टीईटी’ परीक्षा दिली. त्यांची शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी ‘टीईटी’ परीक्षार्थी उमेदवारांमधून होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. याविरोध म्हणून राज्यातील शिक्षक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. केंद्र व राज्य सरकारला न्यायालयात पुनर्रविचार याचिका दाखल करण्यास दबाव आणला जात आहे. दुसरीकडे काही शिक्षक ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करतात. ‘टीईटी’ला विरोध करणारे अन् पेपर फोडणारेही शिक्षकच हा विरोधास असल्याचे मत काही शिक्षक नेत्यांनी व्यक्त केले.