

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीप्रकरणी सोळांकूर (ता. राधानगरी) येथील महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य गुरुनाथ चौगले व बिद्री येथील एका महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापक रोहित सावंत यास संबंधित संस्थांनी धडक कारवाई करीत शुक्रवारी तत्काळ निलंबित केले.
याबाबत पत्र संबंधित संस्थांनी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठवले आहे; तर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक अभिजित पाटील याच्या निलंबनासंदर्भातील कारवाईबाबत संस्थेने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. मुरगूडजवळील सोनगे येथे काही दिवसांपूर्वी ‘टीईटी’चा पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामधील सुमारे 18 हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘टीईटी’ पेपर फोडल्या प्रकरणातील रॅकेटची व्याप्ती वाढत असून, त्याचे परराज्यांत कनेक्शन उघड झाले आहे. या प्रकरणानंतर शिक्षण विभाग ‘अॅक्शन मोड’वर आला असून, याची तत्काळ दखल घेत कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोळांकूर येथील प्राचार्याला संबंधित संस्थेने तत्काळ निलंबित केले आहे. ‘सीएचबी’ प्राध्यापकाचेही निलंबन झाले आहे. त्याबाबतचे पत्र शिवाजी विद्यापीठ, विभागीय उच्च शिक्षण संस्था संचालक कार्यालयास पाठवले आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे लवकरच निलंबन होणार आहे.