TET paper leak Case | म्होरक्या महेश गायकवाडसह आणखी 9 जणांना अटक; गुन्ह्याची व्याप्ती वाढणार?

फॉरेन्सिक पथक मुरगुडात; धागेदोरे हाती
TET paper leak Case
TET paper leak Case | म्होरक्या महेश गायकवाडसह आणखी 9 जणांना अटक; गुन्ह्याची व्याप्ती वाढणार?
Published on
Updated on

मुरगूड : ‘टीईटी’ पेपरफुटीप्रकरणी सोमवारी टोळीचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड) याच्यासह नऊजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकाने मुरगूड पोलिसांच्या मदतीने अटक केली. या सर्वांना कागल प्रथमवर्ग न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, त्याची व्याप्ती वाढणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी रविवारी आठजणांना अटक केली आहे.

या टोळीने टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो, असे सांगून काही परीक्षार्थींकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रांसह रोख रक्कम, कोरे धनादेश स्वीकारून अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस येत आहे. टोळीचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड याचा रविवारपासून शोध सुरू होता. त्यास कराड येथून रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. त्याबरोबरच सोमवारी अमोल पांडुरंग जरग (वय 38, रा. सरवडे, ता. राधानगरी, सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी), रणधीर तुकाराम शेवाळे (46, रा. सैदापूर, ता. कराड), तेजस दीपक मुळीक (22, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार, (32, रा. खोजेवाडी, ता. जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (40, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), श्रीकांत नथुराम चव्हाण (43, रा. विद्यानगर कराड, सध्या रा. उंब—ज, ता. कराड) यांना सोमवारी अटक करण्यात आली. कागल न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी एकूण 18 संशयित अटकेत आहेत.

दरम्यान, टोळीने ज्या परीक्षार्थींकडून मूळ कागदपत्रे व पैसे घेतले आहेत, अशा अनेकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिस आता त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा मिळण्याची शक्यता असल्यामुळे सोमवारी घटनास्थळी व मुरगूड पोलिस ठाण्यात फॉरेन्सिक लॅबचे पथक ठाण मांडून होते. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, तसेच पोलिस अंमलदार युवराज पाटील, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सुरेश राठोड यांच्या पथकाने कारवाई केली.

अनेक टोळ्यांचा सहभाग?

‘टीईटी’ पेपर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या आणखी काही टोळ्या कार्यरत होत्या, अशी माहिती समोर आल्याने पोलिसांनी तपास मोहीम गतीने राबवायला सुरुवात केली आहे. काही टोळ्यांनी शनिवारी रात्रीच काम फत्ते केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news