

कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यभर बहुचर्चित ठरलेल्या टीईटी पेपर फुटीप्रकरणी आंतरराज्य टोळीचा म्होरका रितेशकुमार, मोहम्मद सलीलसह साथीदारांच्या शोधासाठी बिहार, उत्तर प्रदेशला रवाना झालेल्या कोल्हापूर पोलिस पथकाने नेपाळ सीमेपर्यंत धडक मारली. कोल्हापूरचे पथक मागावर असल्याची चाहूल लागताच संशयितांनी डोंगराळ आणि जंगल परिसरात धूम ठोकली. सहा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर पथक सोमवारी रात्री कोल्हापूरला परतले.
टीईटी पेपर फुटीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या सातारा येथील गायकवाड बंधूंच्या चौकशीत बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही टोळ्यांतील म्होरक्यांची नावे निष्पन्न झाली होती. तपासाधिकारी तथा करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागरसह पथकाच्या सखोल चौकशीत पाटणा (बिहार) येथील गांधी मैदान परिसरातील रितेशकुमार, मोहम्मद सलीलसह टोळीतील सहा साथीदारांची नावेही चौकशीतून पुढे आली होती.
पेपरफुटी प्रकरणातील आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक संतोष गळवे यांच्यासह सात पोलिसांचे विशेष पथक तत्काळ बिहारला रवाना केले होते. पथकाने स्थानिक पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्याच्या मदतीने पाटण्यातील गांधी मैदान परिसरासह सिवान जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून संशयिताचा शोध घेतला. मुरगूडला गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशीचे म्होरक्यांसह टोळीने पाटण्यातून पलायन केल्याची माहिती मिळाली.
म्होरक्याच्या पत्नीसह कुटुंबीयांशी संपर्क : नोंदविले जबाब
सहायक निरीक्षक गुळवे यांनी म्होरक्या रितेशकुमार, मोहम्मद सलील याच्या पाटण्यातील कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. रितेशकुमार याच्या पत्नीचाही पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. मात्र टोळीतील अन्य सहा सराईतांचे पोलिसांना उपलब्ध झालेले पत्ते, आधार कार्ड व ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेपाळ सीमेलगत डोंगराळ भागासह जंगलातही शोध मोहीम
म्होरक्यासह साथीदारांनी नेपाळ सीमेलगत डोंगराळ भागावर तसेच जंगल क्षेत्रात आश्रय घेतल्याची स्थानिक पोलिस, खबऱ्याकडून माहिती मिळाली. पाटण्यापासून तीनशे, साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या नेपाळ सीमाभागापर्यंत पथक पोहोचले. परिसरात शोध मोहीम राबवूनही संशयितांचा सुगावा लागला नाही. सहा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर विशेष पथक कोल्हापूरच्या दिशेने परतले.