

कोल्हापूर : राज्य शासनाने शिक्षक भरतीला गती दिली असून, तब्बल दोन वर्षांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला (टेट) मुहूर्त मिळाला आहे. यामुळे राज्यातील 3 लाखांहून अधिक पात्र डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनासह इतर विभागाच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ संगणक प्रणालीद्वारे शिक्षक भरतीपूर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षा घेतली जाते. 2017 मध्ये पहिली ‘टेट’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून 2019 मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, 12 हजार जागांची शिक्षक भरती करणार असल्याचे सांगत केवळ 6 हजार जागा भरण्यात आल्या. 2017 ची शिक्षक भरती अद्यापही अर्धवट आहे. यानंतर पाच वर्षे टेट परीक्षा झालीच नाही.
2022-23 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2 परीक्षा घेण्यात आली. याद्वारे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन टप्प्यांत शिक्षक भरती करणार असल्याचे सांगितले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे 21 हजार जागांवर भरती करण्यात आली. आता दुसर्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
यात नव्याने डीएड, बीएड झालेले तसेच शिक्षक म्हणून निवड न झालेले उमेदवार तिसर्या अभियोग्यता परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर दोन वर्षांनी आता ही परीक्षा होत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा 24 मे ते 5 जून दरम्यान ऑनलाईन होणार आहे. नोंदणीसाठी 10 मेपर्यंत मुदत आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025’ ही परीक्षा देण्यासंदर्भात सुधारित तरतुदीचा शासन निर्णय 2 मे रोजी प्रसिद्ध केला आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठीच्या पात्रतेबाबत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे. आता व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील अथवा शेवटच्या सत्राची अंतिम परीक्षा देणारे उमेदवार परीक्षा देणार आहेत. मात्र, नव्या संच मान्यतेनुसार राज्यात अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. शिक्षक भरतीच्या दुसर्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहिराती पवित्र प्रणालीवर फारशा नाहीत. मग, तिसरी अभियोग्यता परीक्षा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेतील रिक्त जागांवर ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होणार का, असा सवाल उमेदवार करीत आहेत.