

कोल्हापूर/मुरगूड : टीईटी परीक्षा पेपर फुटीप्रकरणी बुधवारी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. आकाश बाबासो कदम (वय 26, रा. गुडे, ता. पन्हाळा), दीपक चंद्रकांत कांबळे (30, रा. करवडी, ता. कराड, जि. सातारा) व इंद्रजीत प्रवीण पुस्तके (31, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात 26 जण आरोपी आहेत. त्यापैकी 21 जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी सांगितले .
मुख्य सूत्रधार महेश गायकवाड व इतर एजंटांच्या चौकशीतून माहिती उघड होत आहे. पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता तपास अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. गायकवाड बंधू आणि एजंट यांच्या कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे.
तपास पथक बिहारमध्येच
प्रश्नपत्रिका पुरवणारा बिहारचा रितेशकुमार आणि त्याचे साथीदार अजूनही फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथक बिहारमध्ये तळ ठोकून तपास करत आहे. पाटणा पोलिसांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू असून काही दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. दरम्यान, टीईटी पेपर फुटी प्रकरणातील म्होरक्या महेश भगवान गायकवाड व अविनाश पांडुरंग कणसे (रा. कराड ) या दोघांना बुधवारी कागल प्रथम वर्ग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली .
लाभार्थ्यांवरही गुन्हा
पेपरफुटीचा लाभ घेऊन टीईटी व सेट परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या लाभार्थ्यांचीही तपास यंत्रणा पडताळणी करत आहे. गैरप्रकार सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्पष्ट केले.