कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे पक्ष आणि आघाड्यांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वीच स्वतः उमेदवारांनीच आपल्या उमेदवार्या जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकीतच विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याचा अनोखा विक्रम कागलने करून दाखविला.
कागलचे राजकारण नेहमी धगधगते राहिले आहे. सोसायटीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत गटागटातील लढती या लक्षवेधी ठरत आल्या आहेत. आताही लोकसभेच्या निवडणुकीत परस्परांचे राजकीय शत्रू असणारे हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे कधी काळी त्यांचे समान शत्रू असलेल्या संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या व्यासपीठावर एकत्र आले.
त्याचवेळी संजय मंडलिक हे विधानसभेला मुश्रीफ यांना पाठिंबा देणार की, समरजित घाटगे यांची बाजू उचलून धरणार याची चर्चा सुरू झाली. यामुळे मंडलिक यांच्यासाठी हा अडचणीचा मुद्दा ठरणार होता. मात्र, मंडलिक यांची या संकटातून हसन मुश्रीफ यांनी सहज सुटका केली. विधानसभेच्या आखाड्यात आपली व समरजित घाटगे यांची कुस्ती ठरली आहे. ती होणारच आहे. त्यामुळे आमच्या उमेदवार्या फायनल आहेत. अशा स्थितीत मंडलिक कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारून त्यांची अडचण करू नका, तर त्यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले. आता हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी कुणी केलं आणि कुणी नाही याचा हिशोब संजय मंडलिक करतील. मात्र, मंडलिक यांच्या पराभवाने महायुतीला धक्का बसला.
हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अचानकपणे घडलेल्या घडामोडीत ते महाविकास आघाडीतून महायुतीत गेले आणि थेट पालकमंत्री झाले. मुश्रीफ आणि घाटगे असे महायुतीत आता एकत्र आले. मात्र, मुश्रीफ मंत्री होताच समरजित घाटगे यांनी भाजपच्या शिस्तीची मुश्रीफ यांना आठवण करून देत आपला स्वतंत्र बाणा दाखवून दिला. हसन मुश्रीफ यांना आव्हाने पेलण्याची सवय आहे. त्यामुळे विक्रमसिंह घाटगे, शामराव भिवाजी पाटील, महादेवराव महाडिक आणि सदाशिवराव मंडलिक अशा चार राजकीय नेत्यांशी योग्यवेळी फारकत घेत त्यांनी आपले बस्तान राजकारणात बसविले आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर काही काळ त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अचूक निर्णय घेत त्यांनी आपल्या विरोधकांवर बाजी पलटवली आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.
आता विधानसभेला खरा सामना आहे. महाविकास आघाडीकडून संजय घाटगे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू असतानाच हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देऊन आपण निवडणूक लढविणार नसल्याचे संजय घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मुश्रीफ यांचे पारडे जड झाले आहे. मुळात ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे, तर महायुतीकडून गेल्यावेळी शिवसेनेतून संजय घाटगे यांनी निवडणूक लढविली होती. ज्यांची उमेदवारी भाजपकडून पक्की मानली जाणार होती ते शाहू सहकार समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे समरजित घाटगे निवडणुकीच्या आखाड्यात स्वतंत्र उमेदवार म्हणून उतरले. तिरंगी लढतीचा फायदा हसन मुश्रीफ यांना होणार हे स्पष्ट होते आणि झालेही तसेच. मुश्रीफ यांना 1 लाख 14 हजार 200 मते मिळाली, तर समरजित घाटगे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतूनही 87 हजार 323 मते मिळाली. हसन मुश्रीफ यांचा 26 हजार 877 मतांनी विजय झाला. शिवसेनेचे संजय घाटगे यांना 55 हजार 657 मते मिळाली. संजय घाटगे निवडणुकीच्या रिंगणात नसते, तर निकाल वेगळा लागला असता याची चर्चा आजही कागलच्या राजकीय वर्तुळात आहे.
आता 2024 चे मैदान जवळ आले आहे. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे उमेदवार असणार हे अंतिम आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असल्याने ते कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीत फूट पडली नसती, तर भाजपकडून समरजित घाटगे निवडणूक रिंगणात असते. मात्र, मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांचा गट महायुतीचा घटक पक्ष झाला, तर ज्या शिवसेनेची ही जागा होती ती शिवसेना महायुतीत न राहता महाविकास आघाडीचा घटक झाली. सध्याच्या परिस्थितीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यांना 55 हजार 657 मते मिळाली होती. घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यामुळे यापैकी बहुतांश मते मुश्रीफ यांच्याकडे वळू शकतात. त्यामुळे त्यांचे पारडे अधिक जड होऊ शकते. अशा बदललेल्या राजकारणात समरजित घाटगे यांना आपले राजकीय कसब पणाला लावावे लागणार आहे. आपण कोणाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप त्यांनी जाहीर केले नाही. मात्र, ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले, तर विजयाचा पल्ला गाठण्यासाठी त्यांची राजकीय कसोटी पणाला लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरल्यास आणि समरजित घाटगे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्यास हसन मुश्रीफ विरोधातील मतांची विभागणी होऊन त्याचा आपसूकच फायदा मुश्रीफ यांना होऊ शकतो. कारण, राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही जागा असल्यामुळे ते आपला उमेदवार निश्चित उभा करणार. महायुतीकडून हसन मुश्रीफ हेच प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे समरजित घाटगे, हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार अशी तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत