Shaktipeth Highway | शक्तिपीठच्या सर्वेक्षणावरून इनाम म्हाळुंगेत तणाव

ग्रामस्थांचा विरोध, सहा प्रमुख पदाधिकारी सहा तास पोलिसांच्या ताब्यात
सर्वेक्षण करणाऱ्या मशिनरीजवळ शेतकरी आल्यानंतर दाखल झालेला पोलिस फौज फाटा.
सर्वेक्षण करणाऱ्या मशिनरीजवळ शेतकरी आल्यानंतर दाखल झालेला पोलिस फौज फाटा.
Published on: 
Updated on: 

चंदगड : शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला चंदगड तालुक्यात शनिवारी (दि.२१) मोनार्क कंपनीने सकाळी १० वाजता प्रारंभ केला. मात्र, याची कुणकुण लागताच हळूहळू ग्रामस्थ व शेतकरी जमू लागल्यानंतर या सर्वेक्षणाला तीव्र विरोध झाला. या दरम्यान शेतकरी व पोलिस यांच्यात बाचाबाचीही झाली. यानंतर सहा शेतकरी व पदाधिकारी यांना चंदगड पोलिसांनी सहा तास ताब्यात ठेवले. काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी त्यांची सुटका केली.

विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनीही प्रयत्न केला. यानंतर विरोध सुरूच राहिल्याने पोलिसांनी इनाम म्हाळुंगेचे सरपंच विठोबा गावडे, चंद्रकांत पाटील, गोमजी गावडे, तानाजी गावडे, दत्तात्रय गावडे आणि दिनकर गावडे यांना चंदगड येथे पोलिस ठाण्यात आणून सहा तासांनी सायंकाळी सोडले. महामार्गाच्या मोजणीसाठी सर्वेक्षण यंत्रणा कोणतीही पूर्वकल्पना न देता गावाच्या हद्दीत दाखल होऊन मोजणीची उपकरणे बसवून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप सरपंच विठोबा गावडे यांनी केला.

सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आले. ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन जाब विचारला. यावर तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सरकारी मालकीच्या जमिनीचे मोजमाप सुरू असल्याने शेतकऱ्यांना नोटीस देण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगितले. दरम्यान, आंदोलनासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. यानंतर पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. घटनास्थळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, संपत देसाई, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, कृष्णा पाटील यांनी भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देत सर्वेक्षणास विरोध केला.

या ठिकाणी केले सर्वेक्षण

कुरणी शेत, कुरणी-म्हाळुंगे फाटा, भोगोली, बिजूर, पिळणी, फाटकवाडी मध्यम प्रकल्प, गवसे-कुरणी सीमा हद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.