kolhapur | महाडिक-मुश्रीफ-नरके गटांचे समर्थक आमनेसामने

सहायक निबंधक कार्यालयाबाहेर रात्री उशिरापर्यंत तणाव; कागदपत्रे पडताळणीचे काम सुरू
कोल्हापूर : दुग्ध विभागाच्या सहायक निबंधक कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमा झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कोल्हापूर : दुग्ध विभागाच्या सहायक निबंधक कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमा झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीतील कार्यक्षेत्राबाहेरील ठरावांच्या कागदपत्रांच्या पडताळणीवरून सोमवारी रात्री सहायक निबंधक कार्यालयाबाहेर राजकीय वातावरण चांगलेच तापले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार चंद्रदीप नरके गटाचे समर्थक रात्री उशिरापर्यंत कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. याची माहिती मिळताच महाडिक गटाचे समर्थकही मोठ्या संख्येने तेथे दाखल झाले. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते.

निकाल देण्यापूर्वी संस्थांच्या कागदपत्रांची योग्य तपासणी करण्यात आली नसल्याचा आरोप संस्था प्रतिनिधींनी केला. त्यामुळे पुन्हा पडताळणी करूनच निकाल देण्यात यावा, या मागणीसाठी संस्था प्रतिनिधी आक्रमक झाले. त्यांनी सहायक निबंधक कार्यालयातच ठाण मांडले. दरम्यान, मुश्रीफ-नरके गटाचे समर्थक कार्यालयाबाहेर थांबल्याचे समजताच महाडिक गटाचे कार्यकर्तेही तेथे दाखल झाले. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील घटनास्थळी दाखल झाल्या. संस्था प्रतिनिधी व समर्थकांसह जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, ‘गोकुळ’चे माजी संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, दत्ता पाटील- केनवडेकर, विकास पाटील यांच्यासह अनेकजण उशिरापर्यंत कार्यालयाबाहेर थांबून होते.

कार्यालय पेटवल्याची अफवा

रात्री उशिरा सहायक निबंधक कार्यालय पेटवून दिल्याची अफवा पसरल्याने काही काळ वातावरण आणखी चिघळले. ही माहिती समजताच अनेक कार्यकर्ते कार्यालयाकडे धाव घेत होते. मात्र, घटनास्थळी आल्यानंतर कार्यालय पेटविल्याची माहिती केवळ अफवा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अपात्र संस्थांच्या प्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत पात्र-अपात्र संस्थांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक उपनिबंधक नारायण परजणे यांनी सोमवारी सायंकाळी ७८९ दूध संस्थांना अपात्र ठरविण्याचा निकाल जाहीर करताच अपात्र संस्थांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सहायक दूध निबंधक कार्यालयातच गोंधळ घातला. अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत ‘निकाल मॅनेज केल्याचा आरोप करत ‘कार्यालयच पेटवून देऊ,’ असा इशारा देण्यात आल्याने काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, अंतिम मतदार यादी तयार करण्यापूर्वी संस्थांची पात्रता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार ७८९ संस्थांना अपात्र ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जाहीर केला. या निकालाची दिवसभर प्रतीक्षा करणारे दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि माजी संचालक निकाल जाहीर होताच संतप्त झाले.

निकालाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारताना कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. ‘पाच वाजण्यापूर्वी निकाल जाहीर होणे अपेक्षित असताना तो उशिरा का जाहीर केला? कोणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला? निकाल देण्यासाठी किती पैसे घेतले?’ अशा संतप्त सवालांनी कार्यालय परिसर दणाणून गेला. ‘पहाटेपासून राबणाऱ्या दूध उत्पादकांचा तुम्हाला शाप लागेल,’ अशा शब्दांतही काहींनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

‘हा निकाल देण्यासाठीच तुमची एका तासात बदली करून येथे आणण्यात आले. तुम्हाला जिल्हा उपनिबंधक व्हायचे आहे ना? आम्हीही तुम्हाला लक्षात ठेवले आहे. कागदपत्रे देऊनही संस्था अपात्र ठरवता. तुम्ही कसे उपनिबंधक होता, हे पाहतोच,’ अशा शब्दांत काही कार्यकर्त्यांनी परझणे यांना दमदाटी केली. मात्र, परजणे यांनी कार्यकर्त्यांना प्रतिउत्तर न देता परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. निकालामागे ‘अदृश्य शक्ती’चा हस्तक्षेप असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news