

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
गुढी पाडव्याच्या दिवशी (रविवार) नवनाथ महाराजांच्या मिरवणुकीत ट्रिपल सीट आलेल्या तरुणांनी दुचाकी घातल्याचा प्रकार समोर आला. त्यातील एकाला दुसऱ्या गटातील तरुणाने कानशिलात मारली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी (दि.३१) ईदची नमाज झाल्यानंतर मारहाण झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या तरुणाच्या घरी जाऊन जाब विचारला. तेव्हा पुन्हा दोन्ही गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
मारहाण करणाऱ्या गटाच्या तरुणांनी गावातून पळ काढला. त्यामुळे सोमवारी सकाळी एक गट चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला. तिथे शेकडोंची गर्दी झाल्याने तणाव आणखीनच वाढला. ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षक पूजा नागरे, सिडको विभागाचे एसीपी सुदर्शन पाटील, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर, चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी वाद मिटविण्यासाठी जमावातील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत तक्रार देण्यावरून पोलिस आणि गावातील नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती. चिकलठाणा पोलिस ठाण्याबाहेर सहायक निरीक्षक समाधान पवार, पीएसआय उत्तम नागरगोजे, दंगा काबू पथक, राजू राखीव पोलिस दलाची तुकडी, एमआयडीसी सिडको पोलिस, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काही वेळाने दोन्ही गटातील तरुण ठाण्याकडे येत असल्याने पोलिसांकडून त्यांना हुसकावून लावले जात होते. सध्या गावात चिकलठाणा पोलिसांचे पथक तळ ठोकून आहे. गावात तणावपूर्ण शांतात आहे.
सकाळी नमाज झाल्यानंतर काही तरुण जाब विचारण्यासाठी आले. मात्र, त्यांनी घरात शिरून महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे चिकलठाणा पोलिस ठाण्यात महिला देखील आल्या होत्या. सध्या पोलिसांकडून तक्रार घेण्याचे काम सुरु आहे. दोन्ही गटाने जरी तक्रार दिली तरी आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ असे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.
गावात कोणी जरी मस्ती केली तर लाहान, मोठे कोणीही पहिले जाणार नाही, थेट लाठीचार्ज करून ठोकून काढू असा सज्जड दम पोलिस उपअधीक्षक पूजा नागरे यांनी दोन्ही गटातील तरुणांना भरला. येणारे सर्व सण शांततेत एकोप्याने साजरे करा असे आवाहन त्यांनी केले आहे.