Karul Ghat Accident | करूळ घाटामध्ये कोसळणारा टेम्पो संरक्षक भिंतीवर अडकला
गगनबावडा : करूळ घाटातील एका धोकादायक वळणावर दाट धुक्यांमुळे चालकाचा ताबा सुटल्याने एक आयशर टेम्पो संरक्षक भिंतीला धडकून पलटी झाला. टेम्पोचा दर्शनी भाग दरीत झुकलेल्या अवस्थेत भिंतीवर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणूनच चालक आणि क्लिनर या अपघातातून आश्चर्यकारक बचावले.
कोल्हापूरहून सावंतवाडीकडे सिमेंटचे पत्रे घेऊन आयशर टेम्पोे (क्र. एमएच-09-4274) निघाला होता. चालक अभिजित कांबळे हा टेम्पो घेऊन करूळ घाट उतरत असताना एका धोकादायक वळणावर दाट धुक्यांमुळे त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्याने अचानक ब्रेक दाबल्याने टेम्पो पलटी होऊन थेट संरक्षक भिंतीवर आदळला.
या धडकेमुळे गॅबियन पद्धतीची संरक्षक भिंत काही प्रमाणात कोसळली आणि टेम्पोेमधील सिमेंटचे पत्रे दरीत विखुरले गेले. टेम्पोचा पुढील भाग दरीच्या दिशेने झुकलेल्या स्थितीत अडकून राहिल्याने चालक व क्लिनरने मोठ्या शिताफीने बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

