

बांबवडे, पुढारी वृत्तसेवा: शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे - पिशवी रस्त्यावरील शिंदेवाडी हद्दीत, घुंगूरकडून गोगवे सेंटरकडे दूध वाहतूक करणारा टेम्पो (Mh -०९- FL ३६१८) व बांबवडेकडून पिशवी कडे जाणाऱ्या मोटर सायकल (mh o9 cF ८५८२) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता घडली. (Kolhapur Accident News)
यात मोटर सायकल वरून प्रवास करणारे नामदेव गुंगा सुर्यवंशी व आर्यन अनिल पाटील (रा. शिंपे, ता. शाहूवाडी) हे दोन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी नामदेव सुर्यवंशी यांचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. याबाबत शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नामदेव सुर्यवंशी हे आपल्या मोटर सायकलवरून पिशवीच्या दिशेने जात होते. तर घुंगूर येथून पिशवी मार्ग गोगवे दूध केंद्राकडे जाणारा पिकअप टेम्पो यांची समोरा समोर जोरदार धडक झाली. यात मोटर सायकल वरील नामदेव गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रूग्णवाहिकेतून कोल्हापूर येथे रूग्णालयात दाखल केले होते. पण उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर आर्यन पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. सुर्यवंशी यांच्या पश्चांत आई- वडील दोन मुले असा परिवार आहे.