कोल्हापूर : आगीच्या ज्वाळांनी भस्मसात झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाने दोन वर्षांनंतर नव्या दिमाखात ‘कमबॅक’ केले आहे. अग्निसुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा, अत्याधुनिक लाईट-साऊंड आणि वातानुकूलन व्यवस्थेचे भक्कम सुरक्षा कवच नाट्यगृहाला देण्यात आले आहे. लोकार्पणापूर्वी नाट्यगृहातील विविध तांत्रिक यंत्रणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, लाईट, साऊंड, एसीसह तांत्रिक व्यवस्था ‘ओके’ असल्याचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
नव्या नाट्यगृहातील अद्ययावत सुविधांचे सुरक्षा कवच
९ वरून थेट ४२ सीसीटीव्ही कॅमेरे पूर्वी नाट्यगृह परिसरात केवळ नऊ सीसीटीव्ही कॅमेरे होते. आता संपूर्ण परिसरातील प्रत्येक महत्त्वाचा भाग कव्हर करणारे तब्बल ४२ अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नाट्यगृहावर अधिक प्रभावी नजर राहणार आहे.
धुराची चाहूल लागताच अलार्म
नाट्यगृहाच्या विविध भागांत स्मोक डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. कुठल्याही भागात धूर आढळल्यास तत्काळ अलार्मद्वारे इशारा मिळणार आहे.
आग नियंत्रणासाठी फायर पंप
आगीचा प्रसंग उद्भवल्यास ती सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रणात आणण्यासाठी फायर पंपची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
स्प्रिंकलरचे सुरक्षा कवच
सभागृह, स्टेज आणि अन्य महत्त्वाच्या भागांत स्प्रिंकलर यंत्रणा बसविण्यात आली आहे. आग लागल्यास प्रारंभीच्या टप्प्यातच ती नियंत्रणात आणण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.
कार्यक्रमानुसार बदलणार प्रकाशयोजना
नाटक, संगीत मैफल, सांस्कृतिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमानुसार प्रकाशयोजना बदलता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार रंगमंचाचे वातावरण तयार करता येणार आहे.
भूमिगत फायर टँक
आपत्कालीन परिस्थितीत पाण्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी भूमिगत फायर टँक उभारण्यात आला आहे.
हॅलोजनची जागा एलईडीने घेतली
मंचावरील जुन्या हॅलोजन लाईटस्ची जागा आता अत्याधुनिक एलईडी प्रकाशयोजनेने घेतली आहे. त्यामुळे अधिक प्रभावी आणि नियंत्रित प्रकाशयोजना करता येणार आहे.