

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी बदलीसाठी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून यामध्ये 26 शिक्षकांची प्रमाणपत्रे बोगस आढळून आली आहेत. यातील चार शिक्षकांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून उर्वरित 22 शिक्षकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या शिक्षकांवर टांगती तलवार आली आहे. या शिक्षकांवर फौजदारी होण्याची शक्यता असल्यामुळे खळबळ माजली आहे.
बदलीमध्ये दिव्यांग शिक्षक व दिव्यांग मुलांचे पालक यांना सवलत दिली जाते. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांगांचे प्रमाणपत्र सादर केले होते. यासंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे दि. 16 जून 2025 रोजी सर्वच दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचीही तपासणी सुरू होती.
जिल्ह्यातील 356 शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. या दिव्यांग प्रमाणपत्रांची दि. 1 सप्टेंबर पासून पडताळणी सुरू करण्यात आली. त्यासाठी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. 355 शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 302 शिक्षकांचे अहवाल बरोबर असल्याचे आढळून आले असून 26 शिक्षकांची प्रमाणपत्रे सदोष आढळून आली आहेत, तर 27 शिक्षकांचे प्रमाणपत्र अन्य कारणास्तव व पुढील तपासणीसाठी पुणे व मुंबई येथील रुग्णालयांत पाठविली आहेत. त्यापैकी यापूर्वी गैरहजर राहिलेल्या 2 व कागदपत्रे सादर न केलेल्या 2 अशा 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 22 शिक्षकांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीबाबत आरोग्य उपसंचालकांना कळविण्यात येणार आहे.
निलंबन, फौजदारी दाखल करणे, ग्राम विकास व दिव्यांग कल्याण विभागास अवगत करणे व संबंधितांचे यूडीआयडी कार्ड रद्द करणे
पडताळणी अहवाल
पडताळणी करण्यात आलेली प्रमाणपत्र : 355
योग्य असलेली प्रमाणपत्र : 302
पुढील तपासणीसाठी : 27
सदोष असलेली प्रमाणपत्र : 26