Kolhapur Circuit Bench | तावडे हॉटेल परिसर अतिक्रमण; २७ ऑगस्टपर्यंत सुनावणी तहकूब

Kolhapur Circuit Bench
Kolhapur Circuit Bench | तावडे हॉटेल परिसर अतिक्रमण; २७ ऑगस्टपर्यंत सुनावणी तहकूबPudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण प्रकरणाची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गुरुवारी (दि. २३) सुनावणी झाली. राज्य शासनाच्या पत्रावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी निश्चित केली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या डिव्हिजन बेंचसमोर ही सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने या मार्गावरील अतिक्रमित जागा महापालिकेची असल्याचा निकाल दिला आहे. त्यानंतर महापालिकेने तेथे सर्व्हे करून अतिक्रमणे पाडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. काही मालमत्ताधारकांनी सर्किट बेंचमध्ये त्याविरोधात याचिका दाखल केली असून, त्यांना कारवाईवर स्थगिती मिळाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने अतिक्रमणे नियमित करावीत, अशा आशयाचे पत्र महापालिकेला पाठविल्याने त्यावर आज सविस्तर युक्तिवाद झाला.

महापालिकेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१८ नंतरची अनधिकृत बांधकामे हटविणे बंधनकारक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर मालमत्ताधारकांच्या वतीने राज्य शासनाच्या पत्रानुसार त्यांनाही दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. एमआरटीपी कायद्यातील कलम १५४ च्या तरतुदींवरही दोन्ही बाजूंनी भूमिका मांडली. यानंतर न्यायालयाने हा राज्य शासनाशी संबंधित मुद्दा असल्याचे नमूद करत, सुनावणी २७ ऑगस्टपर्यंत तहकूब केली. महापालिकेच्या वतीने ॲड. शैलेश नायडू व ॲड. अभिजित अडगुळे यांच्यासह ॲड. श्रीकृष्ण गणबावले, मालमत्ताधारकांच्या वतीने ॲड. विजय थोरात यांनी बाजू मांडली. सुनावणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर रचनाकार पद्मल पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news