

कुरुंदवाड : मुलगी जन्मल्याचा राग, शिक्षक पतसंस्थेतून २० लाख रुपयांचे कर्ज काढून न दिल्याचे कारण आणि माहेरहून पैसे व दागिने आणण्यासाठी तगादा लावत शिक्षिकेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिक्षिका सौ. प्रणिता विनायक परीट (वय ३३) यांनी कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती विनायक बापूसो परीट (३३), सासू संगीता बापूसो परीट (५०) आणि सासरे बापूसो अण्णाप्पा परीट (६०, सर्व रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
५ जून २०२१ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत मजरेवाडी येथील राहत्या घरी सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. फिर्यादीला पहिली व दुसरी मुलगी झाल्याचा राग मनात धरून पती, सासू व सासऱ्यांनी वारंवार वाद घालून मानसिक त्रास दिला. २० लाख रुपये कर्जाची मागणी पूर्ण न केल्याने माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी तगादा लावत मुलाचा दुसरा विवाह करण्यासाठी अखेर घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.