

कोल्हापूर : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर टँकर उलटल्याने निर्माण झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर नागरिकांनी कित्येक तास अक्षरश: नरकयातना भोगल्या. या वाहतूक कोंडीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसेसमधील सुमारे 2,000, एस.टी. बसेसमधून प्रवास करणारे 530, तर खासगी वाहनांनी प्रवास करणारे सुमारे 3,000 हजार प्रवासी अडकून पडले. ना खायला काही, ना प्यायला पाणी. धड झोपता येईना आणि नीट जागेही राहता येईना, नैसर्गिक विधीलाही जाता येईना आणि ते सहनही करता येईना, अशा बिकट अवस्थेत अनेकांनी 10-15 तासांहून अधिक काळ या एक्स्प्रेस वेवर थांबून घालवला.
कोल्हापुरातून दररोज 60 ते 65 खासगी बसेस मुंबईसाठी धावतात. यासह जिल्ह्याच्या आजरा, चंदगड, गारगोटी आदी भागांतून जाणार्या, तसेच कर्नाटक आणि गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईला जाणार्या सुमारे 40 ते 50 खासगी बसेस असतात. मंगळवारी रात्री सुटलेल्या या सर्व बसेस बुधवारी पहाटेपासून एक्स्प्रेस वेवरील कोंडीत अडकल्या. यामध्ये 2,000 हून अधिक प्रवासी आहेत. अशीच अवस्था एस.टी.ची होती. एस.टी.च्या कोल्हापुरातून सुटलेल्या 18 बसेसमधील 530 प्रवासी मंगळवारी रात्री उशिरापासून बुधवारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच अडकून पडले होते. कोल्हापूरहून मुंबईला जाणार्या चारचाकी, प्रवासी वाहतूक करणार्या मिनी बसेस, मालवाहतूक करणारी वाहने अशा शेकडो खासगी वाहनांतील तीन हजारांवर नागरिकांनाही मोठा फटका बसला.
वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना नरकयातना भोगाव्या लागल्या. सोबत असणार्या महिला, लहान मुलांसह वयोवृद्ध आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले. खायला काही मिळत नव्हते, जवळ असणारे पाणीही संपले. नैसर्गिक विधीला जायचे म्हटले तरी अडचण आणि नाही जायचे म्हटले तरीही अडचण. अनेकांना औषधेही घेता आली नाहीत. पुढे आणि मागे वाहनांच्या रांगा असल्याने पुढेही जाता येत नव्हते आणि मागेही जाता येत नव्हते. यामुळे वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहनांत थांबण्याखेरीज पर्याय नव्हता. वाहनात नीट झोपता येत नव्हते आणि अनेकांना नीट जागेही राहता येत नव्हते.
आज मुंबईत अपुरा दूधपुरवठा
‘गोकुळ’कडून मुंबईत दररोज सुमारे दहा लाख लिटर दुधाचे वितरण होते. वाहतूक कोंडीत सर्व टँकर अडकल्याने बुधवारी उशिरापर्यंत दूध मुंबईत पोहोचले नाही. परिणामी, गुरुवारी ‘गोकुळ’कडून होणारा दूधपुरवठा अपुरा होणार आहे.
पाच बसेस वाहतूक कोंडीतून पडल्या बाहेर
कोल्हापुरातील एस.टी.च्या एकूण 18 बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 25 तासांनी एका बाजूने वाहतूक सुरू झाली. यामध्ये एस.टी.च्या 5 बसेस बाहेर पडल्या. रात्री उशिरापर्यंत एस.टी. बसेस मुंबई बसस्थानकापर्यंत पोहोचत होत्या.