

बिद्री : महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजवापराची योग्य नोंद होऊ नये, यासाठी केलेला प्रकार महावितरणच्या तपासणीत उघडकीस आला आहे. या वीजचोरी प्रकरणी बेनिक्रे (ता. कागल) येथील स्वरूप स्टोन क्रशरशी संबंधित अनंत कुलकर्णी व अमोल कुलकर्णी यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या मुरगूड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरदकुमार संकपाळ यांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, २३ जुलै रोजी कागल तालुक्यातील स्वरूप स्टोन क्रशर येथील वीजजोडणीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मीटरमधील पूर्वीच्या वीजवापराच्या नोंदींचा डेटा डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला असता तोही उपलब्ध झाला नाही. त्यानंतर २४ जुलै २०२६ रोजी मीटर क्रमांक २११०४३४७ व सीटी क्रमांक युई-८८७७ जागेवरून काढून सील करण्यात आले व पुढील तपासणीसाठी महावितरणच्या टेस्टिंग विभागाकडे पाठविण्यात आले.
तपासणीदरम्यान मीटरच्या अंतर्गत जोडणीमध्ये फेरफार करून वापरलेल्या विजेची योग्य नोंद होणार नाही, अशी व्यवस्था केल्याचे आढळून आले. तसेच मीटरमधील पूर्वीचा डेटा डाउनलोड होत नसल्याचेही निदर्शनास आले. यावेळी ग्राहकाच्या वतीने अमोल कुलकर्णी व युवराज तिराळे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या वीजचोरी तपासणी मोहिमेत महावितरणचे सहायक अभियंता संतोष सरवळे, मार्गशीर्षा चौगुले, मुख्य तंत्रज्ञ अमोल जाधव व जनमित्रांचा सहभाग होता.
रक्कम भरण्यासाठी नोटीस...
तपासणीतील निष्कर्षांच्या आधारे, विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार वीजवापराचे पुनर्मूल्यांकन करून १६ लाख ४० हजार ६७० इतक्या रकमेचे वीजदेयक २८ सप्टेंबर रोजी देण्यात आले. ग्राहकाला ही रक्कम भरण्यासाठी ४८ तासांची नोटीस देण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही रक्कम न भरल्याने दि. १ रोजी महावितरणच्या वतीने भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.