

कोल्हापूर : गिरोली (ता. पन्हाळा) येथील शेतात जाणार्या गायरान रस्त्याची तात्पुरती डागडुजी करताना ताब्यात घेतलेला जेसीबी परत देण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी करणार्या वाडी रत्नागिरी (जोतिबा) येथील तलाठी रमेश मुरलीधर वळिवडेकर (वय 54, रा. लघुवेतन कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. उजळाईवाडी येथील त्याच्या घराची झाडाझडतीही घेण्यात आली.
कसबा बावडा येथील तक्रारदार व्यापार्याची गिरोली (ता. पन्हाळा) येथे शेतजमीन आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ लागल्याने संबंधिताने शेतात कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. शेतात जाणारा गायरान रस्ता उंचावर, खडबडीत असल्याने त्यांनी जेसीबीद्वारे खडी पसरवून रस्ता व्यवस्थित करून घेतला. मात्र, तलाठी वळिवडेकर यांनी त्यास हरकत घेतली. परवानगी न घेता बेकायदा काम करीत असल्याचा ठपका ठेवून जेसीबी ताब्यात घेतला. तक्रारदाराने तलाठ्याला विनवणी केली.
जेसीबी सोडवायचा आणि कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास 50 हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने बजावले. अखेर तडजोडीअंती 30 हजार रुपयांची मागणी करून 25 हजार रुपयांवर सौदा ठरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. संबंधित व्यापार्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तलाठ्याविरुद्ध तक्रार केली.