Mayor Ruparani Nikam | नगरसेवकांचेही ऐकू नका; अतिक्रमणावर हातोडा टाका : महापौर निकम

अधिकार्‍यांना सूचना; महापालिकेचा वचक निर्माण करा
Mayor Ruparani Nikam
कोल्हापूर : जनता दरबारात बोलताना महापौर रूपाराणी निकम. शेजारी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपमहापौर अक्षय जरग. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे. एका रात्रीत 15-20 केबिन उभारण्याचे धाडस होतेच कसे? अधिकारी फिरतात की नाही? नगरसेवकांसह कोणत्याही लोकप्रतिनिधींचे ऐकू नका, अतिक्रमणावर हातोडा टाका. सार्वजनिक ठिकाणी, महापालिकेच्या जागांसह रस्त्यावर जे अतिक्रमण दिसेल, तेही उचला आणि जप्त करा. महापालिकेचा वचक निर्माण झाला पाहिजे, अशी सूचना महापौर रूपाराणी निकम यांनी सोमवारी (दि. 6) जनता दरबारात अधिकार्‍यांना केली. महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे जनतेने आपल्याला सांगायची काय? असे म्हणून महापौर निकम यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते. दरम्यान, गेल्या जनता दरबारातील 158 पैकी 102 अर्ज निकाली निघाले. उर्वरित अर्ज तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहिल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

वाहनांना फुकट सीट कव्हर

एका नागरिकाने बागल चौक ते बी. टी. कॉलेज रोडवर चक्क रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे सांगून कर्मचार्‍यांना हप्ते आहेत. त्या व्यावसायिकांकडून फुकटात गाडीचे कव्हर घालून घेतल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला. सदर बाजार ते कदमवाडी रोडवर रस्त्यावरच अनेकांनी झोपड्या उभारल्या असल्याचे एकाने सांगितले. झोपड्या त्वरित काढण्याचे आदेश महापौर निकम यांनी दिले. नगररचना विभागाचे अधिकारी पद्मल पाटील यांनी सर्व्हे करून संबंधितांना नोटिसा देऊ, असे स्पष्ट केले. एका दिव्यांग महिलेने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. आरोग्य विभाग, नगररचना विभाग, अतिक्रमण विभागासह इतर विभागांशी संबंधित तक्रार अर्ज आले.

विचारेमाळ येथे 60 सीट सार्वजनिक शौचालय असताना 50 मीटर अंतरावर आणखी 10 सीट सार्वजनिक शौचालय असल्याचे एकाने निदर्शनास आणले. ते शौचालय पाडून तेथे वाचनालय, व्यायामशाळा, भवन बांधावे, अशी मागणी केली. त्यावर महापौर निकम यांनी आरोग्य विभागाला सार्वजनिक शौचालयांचा सर्व्हे करून आठ दिवसांत अहवाल देण्याची सूचना केली. सार्वजनिक शौचालये पाडून कोल्हापूर सार्वजनिक शौचालयमुक्त करण्याची घोषणा केली. दरम्यान, माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिकेची जागा विकली असल्याचा आरोप एका नागरिकाने केला.

आयकार्ड नसल्यास कारवाई

कार्यालयात अधिकार्‍यांच्या गळ्यात आयकार्ड नसल्याचे एका नागरिकाने निदर्शनास आणून दिले. त्यावर महापौर निकम यांनी आयकार्ड नसलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news