कोल्हापूर : कोल्हापूर शहराला राजकीय गॉडफादरच नाही. यामुळे शहराचा विकास रखडला आहे. यामुळे शहराच्या विकासाच्याच दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी महापालिका, पाटबंधारे, नगररचना विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करताना दिल्या. शिवाजी पूल ते राजाराम बंधारा या मार्गावरील शंभर फुटी रिंग रोड आवश्यकच आहे. त्यासह शहर विकासासाठी ब्ल्यू लाईनचाही फेरविचार व्हावा, असे सांगत शहराच्या विकासाच्या विविध प्रश्नांबाबत कोल्हापूरकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
डॉ. जाधव यांनी संबंधित विभागातील अधिकार्यांची दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते. बैठकीत डॉ. जाधव यांनी शहरातील रस्ते, वाहतूक, विमानतळ आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही. लोकसंख्या, वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतुकीची सर्वत्र कोंडी होत आहे. कोल्हापूरच्या पाठीमागून राज्यातील अनेक शहरांचा झपाट्याने विकास झाला. पुणे, नागपूर यांसारख्या शहरापूर्वी कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांनी विमानतळ बांधले. पण, ही शहरे पुढे गेली. कोल्हापूर मागे राहिले. नागपूरमध्ये सर्वत्र काँक्रिटचे रस्ते आहेत. कोल्हापुरात खड्ड्याखेरीज रस्ते दिसत नाहीत. कोल्हापूर विमानतळाला जाण्यासाठी प्रशस्त रस्ताही नाही. ही सर्व परिस्थिती बदलली पाहिजे. याकरिता सर्वांनी कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने योगदान दिले पाहिजे शिवाजी पुलापासून ते कसबा बावड्यातील राजाराम बंधार्यापर्यंत शंभर फुटी रिंग रोड टीपीमध्ये प्रस्तावित आहे. मात्र, ब्ल्यू लाईनचे कारण पुढे केल्याने तो रखडला आहे. पुण्यासारख्या शहरात नदीपात्राच्या बाजूनेच रस्ते आहेत. त्यावर वाहतूक सुरू आहे. मग कोल्हापुरातच हा नियम का? असा सवाल करत हा रिंग रोड झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. याकरिता ब्ल्यू लाईनचा फेरविचार होणे गरजेचे आहे.
आ. महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबच चर्चा केली जाईल. शिवाजी पूल ते राजाराम बंधारा ते शिये आणि कसबा बावडा ते मार्केट यार्ड असा रिंग रोड, शहरात प्रवेश करणारे रस्ते व पुलाची रुंदी वाढविण्याचे प्रयत्न असून आपल्या सूचनांनुसार कामे करू, अशी ग्वाहीही त्यांनी डॉ. जाधव यांना दिली. डॉ. योगेश जाधव म्हणाले, शासन सकारात्मक असल्याने शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय होतील. त्यामुळे सर्वांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आ. क्षीरसागर म्हणाले, शंभर फुटी रिंग रोडसाठी शेतकरी जागा द्यायला तयार आहेत. मात्र, महापालिकेकडून टीडीआर द्यायला वेळ लागतो. ही कामे तत्काळ केली पाहिजेत. हा हिरवा पट्टा, पिवळा केला पाहिजे. पुराची कारणे सांगून उपयोग नाही. अमेरिकेसारख्या देशातही पूर येत आहे. शेतकरी हितासाठी, शहरासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊ, असे सांगितले.
विकास योजनेचे सहायक संचालक दिलीप कदम, राहुल खांडेकर यांनी विकास योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून विकासाच्या द़ृष्टीने डॉ. जाधव यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव या विकास योजनेत करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेतरे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता प्रवीण पारकर, आर्किटेक्ट अमर उपाध्ये उपस्थित होते.
पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी ब्ल्यू लाईनची नियमावली व तांत्रिक बाबींची माहिती दिली. कार्यकारी अभियंता बांदिवडेकर व माने यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे कोल्हापूरचा फायदा झाल्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नामुळेच कोल्हापूर शहरातील ब्ल्यू लाईन इतर शहराच्या मानाने कमी झाल्याचे सांगितले. त्याचा फायदा अनेक शेतकरी आणि शहरातील सार्वजनिक हिताच्या कामांना झाल्याचे त्यांनी सांगितले.