

कोल्हापूर : फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचे कोसळलेले काम असो वा गणेशोत्सवाच्या काळातील विस्कळीत पाणीपुरवठा, याप्रकरणी ठेकेदारांवरच नव्हे तर संबंधित अभियंते व अधिकार्यांवरही कठोर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, पार्किंग, खुल्या जागा, रिंग रोड यासह सर्वच विषयांवरून अधिकार्यांना धारेवर धरत शहरात दर्जेदार रस्ते बांधा, 10 दिवसात पाणीपुरवठ्यात सुधारणा करा, सर्वच कारभार सुधारा अशा सूचनाही यावेळी आबिटकर यांनी केल्या. काम करत नाहीत अशा अधिकार्यांना हाकलून द्या, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. तर आ. अमल महाडिक यांनी महापालिकेच्या कारभाराला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोणतेेही बोगस आणि चुकीचे काम हे आपल्यासाठी शाप आहे, याचे भान ठेवून काम करा. फुलेवाडी येथील अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. परंतु ठेकेदार हा शेवटचा घटक आहे. फक्त त्यावर कारवाई करून चालणार नाही. कनिष्ट अभियंता, उपशहर अभियंता, शहर अभियंता यांची काहीच जबाबदारी नाही का, असा सवालही त्यांनी केला.
महापालिका अधिकार्यांकडून लोकप्रतिनिधींना चांगली वागणूक मिळत नाही. लोकांचे प्रश्न आम्ही उपस्थित करत असतो. होणारे विविध प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन करा, हीच आपली भूमिका असल्याचे सांगून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, विविध कामासंदर्भात महापालिकेला मी 300 पत्रे दिली आहेत. त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींना गांभीर्याने घ्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दमदेखील त्यांनी दिला.