टाकळीवाडीचा वीरपुत्र रोहित खनिकुडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Indian Army Soldier Funeral | “अमर रहे...”च्या घोषणांनी दुमदुमला परिसर; वडील व भावाकडून मुखाग्नी
टाकळीवाडीचा वीरपुत्र रोहित खनिकुडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
Published on
Updated on

कुरुंदवाड : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील जवान रोहित परशुराम खनिकुडे (वय २७) हे जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी उपस्थितांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला.

रोहित खनिकुडे यांचे पार्थिव आज सकाळी टाकळीवाडीत आणण्यात आले. पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. आईचा हंबरडा आणि नातेवाईकांचा विलाप पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “अमर रहे, अमर रहे... रोहित खनिकुडे अमर रहे”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

स्मशानभूमीत शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या वडील परशुराम खनिकुडे आणि मोठे बंधू राहुल खनिकुडे यांनी मुखाग्नी दिला. उपस्थितांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान रोहित खनिकुडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे, गुरुदत्त कारखान्याचे राहुल घाटगे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, पोलीस निरीक्षक संतोष माने,उपनिरीक्षक जीवन पाटील तसेच टाकळीवाडी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोहित खनिकुडे यांनी २०२० साली बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये प्रवेश केला होता. प्रशिक्षणानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमेवर तसेच जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावली. १६ एप्रिल २०२६ रोजी कर्तव्यावर असताना त्यांनी वीरमरण पत्करले. टाकळीवाडीसारख्या छोट्या गावातून देशसेवेचा आदर्श ठेवणाऱ्या या वीरपुत्राच्या बलिदानाने संपूर्ण परिसर हळहळला असून, त्यांच्या स्मृतींना नागरिकांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news