Shivaji Pool Tawde Hotel Flyover | तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल रखडला

सल्लागार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ
Shivaji Pool Tawde Hotel Flyover |
Shivaji Pool Tawde Hotel Flyover | तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल रखडला
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा तावडे हॉटेल ते शिवाजी पूल प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्प पुन्हा एकदा महापालिकेच्या दिरंगाईत अडकला आहे. या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करणे, युटिलिटी शिफ्टिंगचे इस्टिमेट, भूसंपादन व अन्य तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आठवडाभरानंतरही अद्याप वर्क ऑर्डर काढलेली नाही.

जिल्ह्यात दरवर्षी तब्बल 3 ते 4 लाख वाहनांची भर पडत असताना रस्त्यांची रुंदी मात्र वाढत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे अंबाबाई मंदिरासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढत असून धार्मिक पर्यटनासह पावसाळी पर्यटनामुळेही शहरातील वाहतूक ताण प्रचंड वाढला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांसाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर तब्बल दहा चौक असून प्रत्येक चौकात सिग्नलमुळे वाहनांना वारंवार थांबावे लागते.

या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नेमण्याचा विषय सहा महिन्यांपासून महापालिकेत प्रलंबित होता. यासाठी अनेकदा निविदा आणि फेरनिविदा प्रक्रिया राबविली. अखेर मॅक्स ग्लोबल कंपनीची निवड केली आणि स्थायी समितीनेही त्यास मंजुरी दिली. मात्र संबंधित कंपनीला अद्याप वर्क ऑर्डर दिली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. महत्त्वाच्या प्रकल्पात अशी दिरंगाई होत असल्याने भविष्यात प्रत्यक्ष काम किती वेगाने होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हार्ट ऑफ सिटीत अरुंद रस्ते

ताराराणी चौक ते चिमासाहेब चौक हा परिसर हार्ट ऑफ सिटी मानला जातो. येथे रस्ता अरुंद असून वाहतूक कोंडी कायमची डोकेदुखी बनली आहे. या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल उभारण्याची संकल्पना पुढे आली. प्राथमिक स्तरावर प्रकल्पाला मंजुरीही मिळाली; मात्र अंतिम मंजुरीपूर्वी आवश्यक प्रक्रियाच रखडल्या आहेत.

उड्डाणपूल का महत्त्वाचा?

* पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणारा प्रमुख मार्ग

* मार्गावर दिवसाला हजारो वाहनांची वर्दळ, तब्बल 10 चौक आणि सिग्नलमुळे वाहतुकीचा खोळंबा

* ताराराणी चौक ते चिमासाहेब चौक परिसर सर्वाधिक अरुंद

* उड्डाणपूल झाल्यास वेळ व इंधनाची बचत होण्याची अपेक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news