
दानोळी : पुढारी वृत्तसेवा
गतवर्षीचा ऊस दरातील राहिलेला शंभर रुपये हप्ता द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले.
गत नोव्हेंबर महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरातील आंदोलनात राज्य आणि केंद्र सरकारने मध्यस्थी करून टनाला शंभर रुपये देण्याचा तोडगा काढला होता. या घटनेला तब्बल दहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे शिरोळ तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे आणि कार्यकर्त्यांना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि कर्मचाऱ्यांनी घरातून ताब्यात घेतले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.