

पेठवडगाव : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाल्याशिवाय उसाने भरलेली वाहने पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी रात्री दिला. ऊसदराच्या मागणीसाठी संघटनेने वाठार येथे छावणी आंदोलन सुरू केले असून, वाठार–वारणानगर राज्य मार्गावरील पेट्रोल पंपानजीक ठिय्या देत वारणा साखर कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली.
रात्री दहाच्या सुमारास वडगाव पोलिसांनी वाहने सोडण्याची विनंती केली; मात्र शेट्टी यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शेट्टी म्हणाले, ऊसदर जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आमचे आंदोलन बेकायदेशीर असेल, तर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमांनुसार ऊस भरला आहे का, याची तपासणी आरटीओ अधिकारी का करत नाहीत? वाहनचालक आणि मालकांवर अन्याय झाला, तेव्हा संघटना त्यांच्या मदतीला धावून आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी वाहनचालकांनीही सहकार्य करावे.
आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आंदोलकांसह रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांसाठीही संघटनेने भोजनाची व्यवस्था केली. जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, आप्पा एडके, संपतराव पोवार यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.