

कोल्हापूर : गंगावेश परिसरात ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे (वय 69) यांचा सोमवारी सकाळी घरात बेडरूममध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. उत्तरणीय तपासणीनंतर त्यांचा व्हिसेरा, रक्ताचे नमुने राखून ठेवण्यात आले आहेत.
पोलिस अधिकार्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन तपासाला गती दिली. फॉरेन्सिक लॅबसह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. घरातील साहित्याची पाहणी केली. घरातील दागिने, रोख रक्कम सुरक्षित होती. शिवाय वद्धेच्या अंगावर कोणत्याही जखमा, व—ण आढळून आल्या नाहीत. सायंकाळी उत्तरणीय तपासणीनंतर हृदयविकाराच्या धक्क्याने वृद्धेचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचेही सांगण्यात आले.
उषा भिऊंगडे यांच्या पतीचे डिसेंबर 2025 मध्ये निधन झाल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या. भिऊंगडे दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने फुलेवाडी रिंगरोड येथे राहणारा पुतण्या परशुराम भिऊंगडे सुश्रुषा करीत होता. रविवारी रात्री पुतण्या घरी येऊन त्यांना औषधे देऊन गेला होता. सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांनी चुलतीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. शेजार्यांना फोन करून माहिती दिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. शहर पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्यासह फॉरेन्सिक लॅब व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला. वृद्धेच्या संशयास्पद मृत्यूविषयी परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू होती.