

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार कोटी 87 लाख 30 हजारांच्या सर्जिकल साहित्य खरेदीत फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ठेकेदार मयूर वसंत लिंबेकर (रा. शाहूपुरी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.
छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सर्जिकल साहित्य पुरविण्यासाठी मयूर लिंबेकर याने निविदा भरली. या निविदेसोबत मुलुंड येथील ईएसआय हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षकांच्या बनावट सहीचे बनावट दरपत्रक, कोलोप्लास्ट कंपनीचे बनावट सही-शिक्का असलेले विलिंगनेस पत्र आणि याच कंपनीचे बनावट प्राधिकृत पत्र तयार करून निविदा भरली. बनावट कागदपत्राद्वारे या 4 कोटी 87 लाख 30 हजार 500 रुपयांच्या सर्जिकल साहित्य खरेदीचा ठेका मिळविला.
या प्रकरणावरून जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अत्यंत गाजलेल्या या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने शासनास अहवाल सादर केला होता. यानंतर याप्रकरणी कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले होते. गुरुवारी रात्री डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर लिंबेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलिस करीत आहेत.