

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीण न्यायालयाच्या आदेशानुसार नेण्यासाठी सोमवारपासून ‘वनतारा’चे पथक कोल्हापुरात ठिय्या मांडून आहे. याप्रकरणी हत्ती नेण्यासाठी नागरिकांचा विरोध असल्याने नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सोमवारी सुनावणी होणार असून याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह मठांतर्गत येणार्या 865 गावांचे डोळे लागले आहेत.
प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले होते. त्यानुसार नांदणी येथील ममाधुरी उर्फ महादेवी हत्तीणफला गुजरात येथे 2 आठवड्यात पाठविण्याचे परवानगी दिली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात नेण्यासाठी सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात हे पथक दाखल झाले आहे. हत्तीला नेण्यासाठी नागरिकांचा विरोध असल्याने वनताराचे पथकाने कोल्हापुरात आपला मुक्काम वाढविला आहे. शुक्रवारी पथकाने हत्तीची वैद्यकीय तपासणी केली होती. आजच्या सुनावणीकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहे.