कोल्हापूर, पुढारी डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानावेळी राज्यात काही ठिकाणी हिंसक प्रकार घडले. त्यामुळे निवडणुकीला गालबोट लागले. नाशिकमध्ये आमदार सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना उद्देशून तुझा मर्डर फिक्स, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटांत वाद झाला. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर हल्ला करून ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली. तसेच दोन्ही पवार गटांच्या नेत्यांच्या गाड्याही फोडण्यात आल्या. बारामतीत अजित पवार गटाकडून बोगस मतदान केले जात आहे, धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. याचबरोबर इतर ठिकाणी लहान-मोठे वादाचे प्रकार घडले.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवर समीर भुजबळ यांच्यात वादावादी झाली. अगदी धमकी देण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. मतदानासाठी कांदे यांनी बाहेरून शेकडो मतदार आणल्याचा आरोप समीर भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांनी केला. वाहने रोखल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. धक्काबुक्कीचा प्रकार घडला. कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी तुझा मर्डर फिक्स, अशी धमकी दिल्याची तक्रार भुजबळ यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यात परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बन्सी शिरसाठ यांची गाडीदेखील फोडण्यात आली. या दोन्ही घटना घडत असताना परळी मतदारसंघात घाटनांदुर या गावातील तीन मतदान केंद्रांवर हल्ला करून जमावाने ईव्हीएमची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. चोथेवाडी व मुरंबी येथील मतदान केंद्रांवरही जमावाने हल्ला करून तोडफोड केल्याने वातारवण कमालीचे तणावपूर्ण बनले.
बारामती शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील केंद्रावर शरद पवार आणि अजित पवार गट आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. अजित पवार गटाकडून आमच्या बूथवरील कार्यकर्त्यांना बूथवरील कार्यकर्त्यांना तुला उद्या खल्लास करतो, अशी धमकी दिली जात आहे. विरोधी गटाचे काही पदाधिकारी येथे मतदारांना बोलावून घेत आहेत. उमेदवाराचे नाव, चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या त्यांना देत आहेत. खूण करून कोणते बटण दाबायचे ते सांगत आहेत, अशी तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला.
संभाजीनगरात उस्मानपुरा भागातील केंद्राजवळ शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट हे आले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी झेंडा उंचावत घोषणाबाजी केली. त्यावर शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन, अशा शब्दांत खडसावले. याबाबतचा व्हिडीओ विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेअर केला, तसेच निवडणूक आयोगाला पाठविला आहे.