Sugarcane Farmers Protest | पहिली उचल ३,९००, हंगाम संपताना १०० रुपये प्रतिटनाचा प्रस्ताव मान्य

चक्का जाम आंदोलन मागे : पुढील हंगाम सुरू होण्याआधी २०० रुपये; तीन टप्प्यांत पैसे देण्यावर शिक्कामोर्तब; महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Sugarcane Farmers Protest
किणी : ऊस दर आंदोलनात यशस्वी तोडगा निघाल्यानंतर जल्लोष करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राजेंद्र गड्ड्यानवर, संदीप राजोबा आदी.
Published on: 
Updated on: 

पेठवडगाव : ऊस दरप्रश्‍नी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी रात्री उशिरा चक्का जाम आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. साखर कारखानदारांनी प्रतिटन ४,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. मात्र, ही रक्कम तीन टप्प्यांत देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांत काही प्रमाणात नाराजी पसरली आहे. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांची दिवाळी आणि पोलिसांनाही कुटुंबासमवेत सण साजरा करता यावा, या भावनेतून आंदोलन मागे घेत असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात चर्चा झाली. यामध्ये कारखानदारांनी ३,९०० रुपये पहिली उचल, कारखाना बंद होताना १०० रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी २०० रुपये, असे एकूण ४,२०० रुपये प्रतिटन देण्याचा प्रस्ताव दिला. शेतकऱ्यांना ४,२०० रुपये एकरकमी किंवा किमान दोन टप्प्यांत मिळावेत, अशी संघटनेची भूमिका होती. मात्र, तीन टप्प्यांतील प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांच्या पुढे गेल्यास वाढीव रकमेत ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर ३० टक्के हिस्सा कारखानदारांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, किमान ४,००० रुपये एकरकमी मिळावेत, अशी अपेक्षा होती. तीन टप्प्यांतील रक्कम मिळताना विलंब होणार आहे. मात्र, आंदोलन अधिक काळ सुरू ठेवल्यास त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

प्रवाशांची जाहीर माफी

आंदोलनामुळे पुण्यापासून निपाणीपर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या सर्व प्रवाशांची शेट्टी यांनी माफी मागितली.

सांगली, साताऱ्यातही याच धर्तीवर तोडगा

या निर्णयाच्या धर्तीवर सांगली आणि सातारा जिल्ह्यांतही तोडगा काढण्याचे निश्चित झाले. याबाबत संबंधित पालकमंत्र्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नात लक्ष घालून उर्वरित जिल्ह्यांतील आंदोलनावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली. या निर्णयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत लेखी पत्र देण्यात येणार असल्याचे सांगत शेट्टी यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चक्का जाम आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर पोलिसांनी पाचच मिनिटांत टोल नाका परिसर रिकामा करून वाहने मार्गस्‍थ केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक फिस्कटल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आंदोलनस्थळी येत नोटीस बजावली. आंदोलनाबाबत चर्चा केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यासोबत राजू शेट्टी यांची दीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर शेट्टी यांनी हा निर्णय जाहीर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.